नागपूर,
Schools in Vidarbha to reopen from June 30 राज्यातील शाळा सुरू होण्याच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला असून शिक्षण संचालकांनी यापूर्वी काढलेले आदेश रद्द केले आहेत. त्यामुळे १५ जून आणि २२ जूनपासून शाळा सुरू होण्याच्या आधीच्या नियोजनावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विदर्भातील शाळांसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आले होते, मात्र आता त्यातही बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने याआधी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये १५ जूनपासून तर विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. विदर्भातील शाळा २२ जून ते ३० जून या कालावधीत सकाळच्या सत्रात चालवण्याचाही आदेश देण्यात आला होता. मात्र शिक्षण संचालकांनी काढलेले हे सर्व पत्र आता रद्द करण्यात आले आहेत.
१५ जूनच का, १ जुलै का नाही?
या निर्णयाविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी करताना खंडपीठाने शिक्षण विभागाच्या निर्णयावर तीव्र ताशेरे ओढले आणि २२ जूनपासून शाळा सुरू करण्याचा आदेश चुकीचा असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच उन्हाच्या तीव्रतेचा विचार करून शाळांच्या वेळापत्रकात फेरबदल करण्याचे निर्देश दिले. खंडपीठाने यावेळी राज्य सरकारच्या एकसमान वेळापत्रकाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. सर्व शाळा एकाच दिवशी सुरू करायच्या असतील तर तो दिवस १५ जूनच का, १ जुलै का नाही, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला. या सुनावणीनंतर शिक्षण विभागाने पूर्वीचे दोन्ही आदेश मागे घेतले आहेत. नवीन निर्णयानुसार आता विदर्भातील शाळा ३० जूनपासून सुरू करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील सुमारे २० हजार शाळांतील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेचा विचार करून हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.