शेतकऱ्यांचे 'जलसमाधी आंदोलन' प्रशासनाची धावपळ

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
सोलापूर
Gokul sugar factory dues गोकुळ साखर कारखान्याने ऊस बिल थकवल्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलन छेडले. “आम्ही काय भीक मागत आहोत का?” असा संतप्त सवाल करत काही शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजी महाराज तलावात उड्या घेत जलसमाधी आंदोलन सुरू केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा तातडीने हालचालींना लागली.
 


Gokul sugar factory dues  
घटनेनंतर पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. काही वरिष्ठ अधिकारी स्वतः तलावात उतरून शेतकऱ्यांची समजूत काढताना दिसले. मात्र आंदोलनकर्ते शेतकरी प्रचंड संतप्त असल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स दूर सारत शेतकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गोकुळ कारखान्याकडे सुमारे 130 कोटी रुपयांचे ऊस बिल थकीत असून, मागील 17 दिवसांपासून याविरोधात उपोषण सुरू आहे. मात्र प्रशासन आणि संबंधित कारखान्याकडून कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे अखेर टोकाचे पाऊल उचलत जलसमाधी आंदोलन करण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
याआधीही शेतकऱ्यांनी विविध Gokul sugar factory dues  प्रकारची आंदोलने केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शांततापूर्ण ठिय्या आंदोलन, तसेच अर्धनग्न आंदोलनही करण्यात आले होते. मात्र तरीही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटल्याचे सांगितले जात आहे. कारखाना आणि प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी “आरपारची लढाई” सुरू केल्याचे स्पष्ट केले.दरम्यान, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ऊस बिले थकीत असल्याने संताप वाढत चालला आहे. हक्काच्या पैशांसाठी वारंवार आंदोलन करावे लागत असल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर घडलेल्या जलसमाधी आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.