तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
preparations-for-a-clash : ताडउमरी गावाजवळ तलवारी, लोखंडी रॉड व काठ्या घेऊन दोन गटांतील युवक आमनेसामने आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. पांढरकवडा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मोठा अनर्थ टाळला. या प्रकरणी दोन्ही गटांतील 12 जणांना अटक करण्यात आले असून दोन तलवारी, एक लोखंडी रॉड, पाच काठ्या व चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, 9 जून रोजी संध्याकाळी ताडउमरी गावाजवळ दोन गटांतील युवक शस्त्रांसह आमनेसामने असल्याची माहिती पांढरकवडा पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक तावरे यांच्या नेतृत्वात पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटांतील युवकांना ताब्यात घेतले.
या प्रकरणात आकीब बेग अहेफाज बेग मिर्झा यांच्या तक्रारीवरून करण संजय शिंदे, सुजीत मोक्षवीर वानखेडे, शेख समीर शेख चाँद, पार्थ पंकज शेटे, आशिष माणिक बेहेरे, साईराम सुखदेव आगरकर व एका अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुजीत मोक्षवीर वानखेडे यांच्या फिर्यादीवरून आकीब अहेफाज मिर्झा, नाझीम अहेफाज मिर्झा, चिरंजीव रामदास लेनरे, सैयद अदनाम अली व अनूप राजू कनाके यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणातील करण शिंदे व सुजित वानखेडे हे दोघेही यापूर्वी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून जिल्ह्यात प्रवेश केल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम 142 अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी कारवाईदरम्यान दोन तलवारी, एक लोखंडी रॉड, पाच लाकडी काठ्या, चार मोटारसायकली असा सुमारे 2 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात व उपविभागीय पोलिस अधिकारी रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक तावरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पुढील तपास सपोनि संदीप नरसाळे व सागर पेंढारकर करीत आहेत.