मानोरा,
orange orchards तालुक्यातील संत्रा बागायतदारांचे दिवस तीव्र उन्हाच्या झळांनी फिरले आहेत. बागांची पाहणी केली असता अनेक बागांतील संत्रा झाडे पूर्णपणे करपल्याचे निदर्शनास येत आहे. कारखेडा, तळप, वरोली, चिखली, कारली, बोरव्हा, बेलोरा, कोंडोली, विठोली, हिवरा, जवळा, अभयखेडा,हळदा, गिरोली, कोल्हार, साखरडोह, आसोला, सोयजना सह इतरही गावांमध्ये शेतकर्यांच्या संत्र्याच्या बागा आहेत ज्यांना उन्हाचा फटका यावर्षी बसला आहे.
संत्रा झाडांची पाने पूर्णपणे जळाली असून झाडे वाळून गेली आहेत. बागायतदारांच्या मते प्रत्येक बागेतील किमान २०% झाडे निकामी झाली आहेत. ४-५ वर्षे मेहनत करून उभी केलेली बाग एका आठवड्यातील तीव्र उन्हाने उद्ध्वस्त झाली आहे. या आठवड्यात पावसाचे आगमन न झाल्यास उर्वरित झाडेही वाचणे अवघड आहे, असा भीतीदायक अंदाज बागायतदारांनी व्यक्त केला आहे. लाखो रुपयांचे नुकसान होऊन कर्जबाजारी शेतकरी आता सरकारकडून मदतीची वाट पाहत आहे.मागील चार ते पाच वर्षांपासून प्रचंड कष्ट आणि खर्च करून उभ्या केलेल्या बागा तीव्र उन्हाच्या झळांनी यावर्षी करपल्यानेआमची मेहनत वाया गेली असून मोठ्या आर्थिक नुकसानीला आम्हाला आता सामोरे जावे लागणार असल्याच्या प्रतिक्रिया कारखेडा येथील युवा शेतकरी संदीप योगेंद्र देशमुख यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ व्यक्त केली.