तभा वृत्तसेवा
पांढरकवडा,
या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, अनेक घरांवरील आणि व्यापारी संकुलांवरील टीनपत्रे पत्त्यासारखी उडून गेली. जुन्या स्टेट बँक इमारतीमध्ये कार्यरत असलेल्या एका कृषी केंद्राचे छप्पर उडून थेट मुख्य रस्त्यावर आणि विजेच्या तारांवर जाऊन पडले. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.
अनेक दुकानांचे महागडे फलक आणि जाहिरात होर्डिंग्स कोसळल्याने व्यापाèयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. वाèयासोबत आलेल्या मुसळधार पावसामुळे छप्परे उडालेल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले, ज्यामुळे घरगुती साहित्याचे अतोनात नुकसान झाले.
या वादळात परिसरातील अनेक जुनी व मोठी झाडे उन्मळून पडली. शिवाजी चौकातील एक महाकाय झाड रस्त्यावर कोसळल्याने हा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. स्टेट बँक चौक आणि बालाजीनगर भागातही झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून रस्त्यावर आल्या.सुकळी मार्गावरही हीच परिस्थिती असल्याने काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने रस्त्यावरील झाडे बाजूला करण्याचे काम हाती घेतले. वादळामुळे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या, तर सुकळी मार्गावरील काही विद्युत खांब थेट जमिनीवर कोसळले. या भागात बसवण्यात आलेल्या सौरऊर्जा संचांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला असून, महावितरणच्या माहितीनुसार, खांब कोलमडल्यामुळे वीज यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
या अवकाळी पावसामुळे हाताशी आलेल्या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतात उभे असलेले पीक आडवे झाल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे खचला आहे. नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांनी शासनाने त्वरित या भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करावेत आणि योग्य ती आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले असून वादळी हवामानात झाडांचा आश्रय घेऊ नये, असे स्पष्ट केले आहे.
मारेगाव तालुक्यात बरसल्या पावसाच्या सरी
शेतकèयांची पीक पेरणीसाठी लगबग सुरू असतानाच मृग नक्षत्र सुरू होताच सोमवार, 8 जूनला दमदार पाऊस बरसला. त्यामुळे तापलेल्या वातावरणात अचानक बदल झाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. रोहिणी नक्षत्र कोरडे गेले असून वातावरणात असह्य उकाडा होता. 8 जूनला मृग नक्षत्राची सुरुवात झाली. वातावरण तापलेले असताना संध्याकाळी 5 वाजता मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार एन्ट्री केली. त्यामुळे वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला.
बळीराजांनो, पेरणीसाठी घाई करू नका..
हा अवकाळी पाऊस असून तो अजूनही पेरणीयोग्य बरसलेला नाही. पुरेशा पावसाशिवाय, म्हणजे योग्य ओलाव्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन मारेगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तरीही अनेक शेतकèयांनी स्वतः ‘रिस्क’ घेऊन पेरणी केलेली दिसत आहे.