आमचे अभियान यशस्वी झाले...

होर्मुझजवळील तीन इराणी तळांवर अमेरिकेचे हल्ले

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
तेहरान,
US attacks on three Iranian bases मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचला असून होर्मुझच्या सामुद्रधुनी परिसरात अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. अमेरिकेने इराणमधील बंदर अब्बास, जास्क आणि केशम बेट परिसरातील लष्करी ठिकाणांवर लक्ष्यित हल्ले केल्याचा दावा केला आहे. या कारवाईनंतर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने आपले उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याचे जाहीर केले. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई आत्मसंरक्षणाच्या अधिकारांतर्गत करण्यात आली. होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेचे अपाचे हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याचा दावा केला होता. त्यानंतर अमेरिकन लष्कराने इराणविरोधात लष्करी मोहीम राबवली.
 
 

Iranian bases 
मात्र, इराणने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी कोणतेही अमेरिकन हेलिकॉप्टर पाडले नसल्याचे सांगत, या कथित घटनेचा आधार घेऊन अमेरिकेने हल्ला केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत.अमेरिकन लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हवाई दल आणि नौदलाच्या लढाऊ विमानांनी संयुक्तपणे ही मोहीम पार पाडली. अत्याधुनिक अचूक दारुगोळ्यांचा वापर करून इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणा, भू-नियंत्रण केंद्रे आणि निगराणी रडार केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. होर्मुझच्या सामुद्रधुनीलगत असलेल्या या ठिकाणांचा वापर लष्करी हालचाली आणि समुद्री मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
 
 
सेंटकॉमच्या निवेदनानुसार, अलीकडच्या काळात अमेरिकन सैन्य आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, या प्रदेशातील आपल्या सैन्याचे तसेच जागतिक व्यापारासाठी महत्त्वाच्या समुद्री मार्गांचे संरक्षण करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. दरम्यान, होर्मुझच्या सामुद्रधुनीत वाढलेल्या तणावामुळे संपूर्ण जगाचे लक्ष मध्य पूर्वेकडे लागले आहे. जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा समुद्री मार्ग संघर्षाच्या छायेत आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकन सैन्यानेही कोणत्याही संभाव्य इराणी प्रत्युत्तरासाठी आपली तयारी पूर्ण असल्याचे सांगितले असून परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.