पुणे
illegal liquor Pune पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या जीवितहानीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) पुणे जिल्ह्यात अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्रीवर कठोर कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील १८८ ग्रामपंचायतींना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदा दारू धंद्यांची माहिती प्रशासनाला देण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
उत्पादन शुल्क विभागाने पुणे शहरालगतची तसेच जिल्ह्यातील विविध गावांची यादी तयार केली असून या गावांमध्ये हातभट्टी दारू तयार केली जात असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. ही दारू शहर आणि परिसरात विक्रीसाठी पाठवली जात असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या असून गावपातळीवर अशा अवैध व्यवसायांना आळा घालण्याची जबाबदारी वाढविण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क illegal liquor Pune विभागाच्या पुणे कार्यालयाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावरील सोरतापवाडी, कुंजीरवाडी, नांदूर, तसेच शिरूर तालुक्यातील राजेवाडी, भोसलेवाडी, आपटी यांसह एकूण १८८ गावांमध्ये बेकायदा दारू निर्मिती आणि विक्रीच्या शक्यता आढळून आल्या आहेत. या गावांमध्ये निर्जन भाग, शासकीय जमिनी आणि झाडाझुडपांच्या परिसरात हातभट्टी दारूच्या भट्ट्या उभारल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे.दरम्यान, ग्रामस्थांनी या अवैध धंद्यांविरोधात माहिती दिल्यास संबंधितांना धमकावले जात असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. काही ठिकाणी या धंद्यांना स्थानिक प्रभावशाली व्यक्तींचे पाठबळ असल्याने नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य उघडपणे तक्रार करण्यास घाबरत असल्याचेही एका ग्रामपंचायत सदस्याने सांगितले. त्यामुळे गावपातळीवर कारवाई करताना मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ग्रामपंचायतींना स्पष्ट सूचना देत त्यांच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचा बेकायदा दारू व्यवसाय खपवून घेतला जाणार नाही, असे बजावले आहे. अशा प्रकरणांची माहिती तातडीने उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.दरम्यान, अलीकडील विषारी दारू प्रकरणात पुण्यातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात एकूण २२ जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर फुगेवाडीतील तिघांना उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.या घटनांनंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्तपणे अवैध दारूविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली असून पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर छापेमारी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.