नवी दिल्ली,
200 days of heatwaves in India देशभरात वाढत्या तापमानाने नागरिक हैराण असतानाच हवामान तज्ज्ञांनी आणखी एक गंभीर इशारा दिला आहे. प्रशांत महासागरात अल-नीनोची स्थिती अधिक तीव्र होत असून त्याचा थेट परिणाम भारताच्या हवामानावर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र ठरणार असून मान्सूनवरही त्याचे परिणाम दिसू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.हवामान अभ्यासकांच्या मते, गेल्या काही वर्षांत देशातील उष्णतेच्या लाटांचा कालावधी झपाट्याने वाढला आहे. २०१३ मध्ये सुमारे १०० दिवस उष्णतेच्या लाटा नोंदवण्यात आल्या होत्या, तर २०२६ मध्ये हा कालावधी जवळपास २०० दिवसांपर्यंत पोहोचल्याचे निरीक्षण समोर आले आहे. त्यामुळे मार्चपासून जुलैपर्यंत अनेक भागांमध्ये तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.
अल-नीनो सक्रिय झाल्यामुळे नैऋत्य मान्सूनच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास खरीप हंगामातील पिकांना फटका बसू शकतो. विशेषतः भात, कापूस, गहू आणि इतर महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम अन्नधान्याच्या किमतींवर आणि महागाईवरही होऊ शकतो.तज्ज्ञांच्या मते, सध्या देशातील अनेक भागांमध्ये तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत सरासरी तापमानातही वाढ नोंदवली गेली आहे. उष्णतेसोबतच दमट वातावरणामुळे नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागू शकतो.
अल-नीनोचा प्रभाव केवळ भारतापुरता मर्यादित नसून जगभरातील अनेक देशांवर त्याचे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. काही भागांत दुष्काळ, तर काही ठिकाणी असामान्य हवामान बदल आणि शेती उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काही महिने हवामान आणि अन्नसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. पाणीटंचाई, उष्माघात आणि शेतीवरील परिणाम यांचा सामना करण्यासाठी राज्ये आणि केंद्र सरकारही विविध उपाययोजनांच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.