तालुका क्रीडा संकुलातील सुविधांसाठी अक्षय कडू यांचे बेमुदत उपोषण सुरू

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा, 
akshay-kadu : पांढरकवडा तालुका क्रीडा संकुल येथील विविध मूलभूत सुविधा, विकासकामे व खेळाडूंच्या प्रलंबित मागण्यांसाठी क्रिकेट प्रशिक्षक अक्षय बाबाराव कडू यांनी बुधवारी बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. त्यांच्या आंदोलनाला विविध सामाजिक, क्रीडा व युवक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
 
 
 
y11Jun-Uposhan
 
 
 
अक्षय कडू यांनी उपविभागीय अधिकाèयांना दिलेल्या निवेदनात, क्रीडा संकुलातील सुविधांचा अभाव, रखडलेली विकासकामे, सुरक्षेचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची अपुरी व्यवस्था, तसेच खेळाडूंना आवश्यक असलेल्या आधुनिक प्रशिक्षण सुविधांचा अभाव याकडे लक्ष वेधले होते. या मागण्यांवर प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.
 
 
उपोषणस्थळी विविध सामाजिक संस्था, क्रीडाप्रेमी, माजी खेळाडू, युवक संघटना तसेच नागरिकांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. क्रीडा संकुलातून अनेक राष्ट्रीय व राज्यस्तर खेळाडू घडले असून त्यांच्या हितासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
 
 
जोपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार अक्षय कडू यांनी व्यक्त केला. या आंदोलनामुळे तालुक्यातील क्रीडा क्षेत्रातील प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेते याकडे खेळाडू व नागरिकांचे लक्ष लागले आहे.