तिरुवनंतपुरम,
Bangladeshis in Kerala केरळमध्ये तब्बल १०,००० बांगलादेशी नागरिक बनावट भारतीय ओळखपत्रांच्या आधारे ‘स्थलांतरित मजूर’ म्हणून वास्तव्यास असल्याचा गंभीर खुलासा समोर आला आहे. केवळ ७०० रुपयांत आधार, पॅन आणि मतदार ओळखपत्रासारखी महत्त्वाची कागदपत्रे बनवून देणाऱ्या बेंगळुरूतील एका रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर राज्य आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.ही माहिती समोर आल्यानंतर कोल्लम जिल्ह्यातील कोट्टारक्करा येथे करण्यात आलेल्या कारवाईत १० बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. हे सर्व जण अनेक वर्षांपासून भारतीय नागरिक असल्याचे भासवत केरळमध्ये राहत होते. तपासादरम्यान त्यांच्या मोबाईलमधून बांगलादेशी पासपोर्टच्या प्रती मिळाल्यानंतर त्यांच्या खऱ्या ओळखीचा उलगडा झाला.
आधार कार्ड, रेशन कार्ड सहज मिळतात
तपास यंत्रणांच्या मते, या संपूर्ण घुसखोरीची प्रक्रिया बांगलादेश सीमेलगतच्या भागांतून सुरू होते. काही जण प्रथम पश्चिम बंगालमध्ये, विशेषतः मुर्शिदाबादसारख्या भागात प्रवेश करतात आणि तेथे सुरुवातीची बनावट कागदपत्रे मिळवतात. त्यानंतर ते स्थलांतरित मजूर म्हणून केरळसह इतर राज्यांमध्ये पोहोचतात आणि स्थानिक पत्त्यांच्या आधारे पूर्णपणे भारतीय ओळख निर्माण करतात.अहवालांनुसार, या रॅकेटच्या माध्यमातून आधार कार्ड, रेशन कार्ड यांसारखी कागदपत्रे अवघ्या ७०० रुपयांत मिळत होती. इतक्या कमी खर्चात तयार होणारी ही बनावट कागदपत्रे खरी आणि खोटी ओळखणेही कठीण असल्याचे तपासात समोर आले आहे.
‘चेन मायग्रेशन’चा प्रकार उघडकीस
पोलिसांना संशय आहे की या संपूर्ण नेटवर्कच्या मागे बेंगळुरूमध्ये कार्यरत मोठे रॅकेट असू शकते. या प्रकरणात ‘चेन मायग्रेशन’चा प्रकारही उघडकीस आला आहे, ज्यामध्ये आधी आलेले लोक आपल्या नातेवाईकांनाही भारतात आणतात आणि त्यांनाही बनावट ओळखपत्रे मिळवून देतात.एका प्रकरणात मुगल खातून नावाच्या महिलेने १३ वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमार्गे केरळमध्ये प्रवेश केला होता आणि नंतर बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक नातेवाईकांना येथे आणल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. तिने अटकेपूर्वी बांगलादेशी पासपोर्ट वापरून आपल्या दोन मुलांसह बांगलादेशला प्रवास केल्याची माहितीही समोर आली आहे.सध्या राज्य आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणा या संपूर्ण प्रकरणाकडे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर धोका म्हणून पाहत असून, या बनावट कागदपत्रांचा गैरवापर गुन्हेगारी किंवा इतर राष्ट्रविरोधी कारवायांसाठी झाला आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.