अमरावती,
banned-cotton-seeds-seized : तळेगाव दशासर पोलिसांनी निमगव्हाण शेतशिवारात असलेल्या अनधिकृत गोदामावर धाड टाकून ७ लाख १२ हजार ८०० रुपयांचे प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाणे जप्त केले व एका आरोपीस अटक केली.
हर्बिसाईड टॉलेरंट बॅसिलस थुरींजियांसिस, म्हणजेच एचटीबीटी या जणुकीय बदल केलेल्या कापसाच्या वाणामुळे पर्यावरणाचा र्हास होत असल्याने शासनाने हे कापसाचे वाण प्रतिबंधित केले असून सुद्धा बाजारात हे बियाणे विकून शेतकर्यांची फसवणूक केल्या जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्यामार्फत पोहोचली. त्यामुळे अशा प्रतिबंधीत बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे त्यांनी सर्व ठाणेदारांना आदेशित केले होते. त्यानुसार १० जून रोजी तळेगाव दशासर पोलिस ठाण्यातील पथक त्या हद्दीत गस्त करीत असताना ठाणेदार किरण औटे यांना शुभमसिंग बलजितसिंग चौधरी, रा. धामणगाव रेल्वे याने चांदूर रेल्वे तालुक्यातील निमगव्हाण शेत शिवारामध्ये राजकुमार व्यंकट पर्बत यांच्या शेतातील खोलीमध्ये या बियाणांचा साठा करून ठेवला असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांनाही सोबत घेऊन निमगव्हाण शेत शिवारामध्ये धाड टाकली असता शुभमसिंग चौधरी आढळला. तिथे पंचासमक्ष खोलीची पाहणी केला असता प्रतिबंधित एचटीबीटी कपाशीचे कोहिनूर ब्रँडचे ५६ पॅकेट, ग्लायको गार्ड ब्रँडचे १४० पॅकेट, विराट ब्रँडचे १५५ पॅकेट, महाराजा ब्रँडचे ८१ पॅकेट असे एकूण ४३२ पॅकेट आढळून आले. त्याची एकूण किंमत ७ लाख १२ हजार ८०० रुपये आहे. ते सर्व जप्त करण्यात आले. कृषी अधिकारी तथा गुण नियंत्रण निरीक्षक रवी राणे यांच्या तक्रारीवरून तळेगाव दशासर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला व आरोपीस अटक करण्यात आली.