'कार्यक्रम ओके' म्हणत बाईकोने नवऱ्याचा 'गेम' केला

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
बीड
Beed murder case लिंबागणेश परिसरात घडलेल्या एका धक्कादायक हत्याप्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला असून, सुरुवातीला अपघात भासणाऱ्या घटनेमागे पत्नी आणि तिच्या प्रियकराचा संगनमताने रचलेला कट असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. “कार्यक्रम ओके” या कोडवर्डद्वारे हत्येची माहिती दिली गेल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
 

बीड Beed murder case 
नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३१ मे रोजी लिंबागणेश परिसरात रोडलगत दुचाकीसह किरण सोनवणे या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. प्रारंभी हा अपघात असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात संशयास्पद बाबी समोर आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आणि या घटनेमागे हत्येचा कट असल्याचे स्पष्ट झाले.
 
 
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, किरण सोनवणे याची पत्नी प्रियांका सोनवणे हिनेच पतीला चिकन राईस आणण्यासाठी घराबाहेर पाठवले होते. त्याच वेळी तिने आपल्या प्रियकर दशरथ परदेशी याला माहिती दिली. त्यानंतर दशरथ परदेशी याने मित्र धीरज येडे यांच्या मदतीने किरण सोनवणे याच्यावर हल्ला करून त्याचा गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. नंतर अपघात भासावा म्हणून मृतदेहाजवळ दुचाकी ठेवण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे.हत्येनंतर दशरथ परदेशी याने प्रियांका सोनवणेला फोन करून “कार्यक्रम ओके” असा कोडवर्डद्वारे संदेश दिला. त्यानंतर दोघांमध्ये रात्री उशिरापर्यंत इंस्टाग्रामच्या माध्यमातून संवाद सुरू असल्याचे डिजिटल पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. या संभाषणांमुळे पोलिस तपासाला निर्णायक दिशा मिळाली.
 
 
या प्रकरणात Beed murder case  पोलिसांनी प्रियांका सोनवणे, दशरथ परदेशी आणि धीरज येडे या तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आरोपींनी वैयक्तिक कारणांमुळे आणि कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याचा दावा केल्याचे समजते. संबंधित तरुण वारंवार दारू पिऊन त्रास देत असल्याने हे पाऊल उचलल्याचेही आरोपींच्या जबाबात नमूद आहे.
या घटनेनंतर बीड परिसरात तीव्र खळबळ उडाली असून नातेसंबंध, विश्वासघात आणि गुन्हेगारीचा संगम असलेल्या या प्रकरणामुळे समाजात चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून डिजिटल पुरावे आणि संवादांच्या आधारे संपूर्ण कटकारस्थानाची व्याप्ती तपासली जात आहे.
Get smarter responses, upload files and images, and more.