अबब..बोरखेडीत पाण्याचा ट्रॅकर १ हजारात

शासकीय पाणी १० दिवसांपासून बेपत्ता

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
तळेगाव
Borkhedi water crisis आष्टी तालुयातील बांबरडा व बोरखेडी या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत आहे. शासनाच्या वतीने नियमित पुरवठा होणारा पाण्याचा टँकर गेल्या दहा दिवसांपासून गावात फिरकलाच नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पाणी नसल्याने गावकर्‍यांना १ हजार रुपयात एक ट्रॅकर पाणी विकत घ्यावे लागते. परिस्थिती नसल्याने १० जण मिळून एक ट्रॅकर पाणी विकत घ्यावे लागत आहे.
 

Borkhedi water crisis, Ashti taluka water shortage 
पावसाळा सुरू झाला असला तरी उन्हाच्या झळा कमी झाल्या नाहीत. गावातील विहिरी आणि हातपंपांची पाणीपातळी खालावली आहे. अशा परिस्थितीत टँकर हाच नागरिकांचा एकमेव आधार होता. मात्र तोही अचानक बंद झाल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे हाल होत आहेत. अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी दूर शिवारात जावे लागत असून दिवसाचा मोठा वेळ केवळ पाणी मिळविण्यात खर्च होत आहे.
 
ग्रामस्थांनी या गंभीरBorkhedi water crisis  समस्येबाबत ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे मोबाईल क्रमांक सतत ’नॉट रिचेबल’ लागत असल्याने नागरिकांची चीड आणखी वाढली आहे. गावकर्‍यांच्या म्हणण्यानुसार, पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसून प्रशासन पूर्णपणे उदासीन आहे. शासन ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नसल्याचे दावे करत असताना दुसरीकडे बांबरडा आणि बोरखेडी येथील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दहा दिवसांपासून टँकर सेवा बंद असतानाही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नियमित टँकर सेवा सुरू करावी, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा गावकर्‍यांनी दिला आहे.