चामोर्शी,
minor girl assault case शहरातील सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज 11 जुन रोज गुरुवारी चामोर्शी शहरात अभूतपूर्व जनआक्रोश उसळला. हजारो महिलांसह विविध सामाजिक, राजकीय व व्यापारी संघटनांनी एकत्र येत शहर बंद पाळला. लक्ष्मी गेटपासून थेट पोलिस ठाण्यावर विराट मोर्चा काढत पीडितेला न्याय मिळवून देण्याची जोरदार मागणी केली. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे आणि तपासात कोणतीही हयगय होऊ नये, अशा मागण्यांचे निवेदन पोलिस अधीक्षकांना देण्यात आले.
या घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पीडीत मुलींच्या घराच्या कामावर काम करणार प्रज्वल उर्फ नारू भांडेकर (27) याने 8 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पीडित सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता. त्याच पृष्ठभूमीवर गुरुवारी चामोर्शी शहरातील मुख्य बाजारपेठ, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच आठवडी बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. व्यापारी संघटना, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदला पाठिंबा दिला.
शहरातील प्रमुख मार्गांवरून minor girl assault case निघालेल्या मोर्चामध्ये ‘पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, महिलांवरील अत्याचार बंद करा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.या प्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत गंभीर कलमांसह लैंगिक अपराधांपासूनबालकांचे संरक्षण (पोस्को) कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी 2019 मध्ये ट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या पृष्ठभूमीवर आरोपीच्या गुन्हेगारी वृत्तीची सखोल चौकशी करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.
पोलिस अधीक्षकांना चामोर्शीत बोलावण्याचा आग्रह
मोर्चा पोलिस ठाण्यावर पोहोचल्यानंतर महिलांनी थेट पोलिस अधीक्षकांनी येऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी ठाम भूमिका घेतली. महिलांच्या आग्रहामुळे अखेर पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी चामोर्शी येथे दाखल होत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला.
पोलिस अधीक्षकांनी महिला प्रतिनिधी मंडळ, पीडित कुटुंबीय तसेच विविध संघटनांच्या पदाधिकार्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी तपासाची संपूर्ण माहिती देत दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, तसेच 30 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन देऊन फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. तपासामध्ये कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसून, संबंधित यंत्रणांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नाही तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.