सातासमुद्रापार घुमला ‘गण गण गणात बोते’चा जयघोष

कनेक्टिकटमध्ये श्री गजानन महाराजांचा भक्तिमय सोहळा

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
नागपूर,
shri-gajanan-maharaj : अमेरिकेतील कनेक्टिकट येथे श्री गजानन महाराजांच्या पादुका आणि मुखवट्याचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. न्यू जर्सी राज्यातील न्यू ब्रन्सविक येथील श्री गजानन महाराज मंदिरातून पादुका आणि मुखवटा कनेक्टिकटमध्ये आणण्यात आले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
 
 
 

shri-gajanan-maharaj
 
 
 
 
या कार्यक्रमासाठी कनेक्टिकटसह आसपासच्या भागांतून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. सोहळ्याची सुरुवात श्री गजानन महाराजांच्या पादुका आणि श्री गजानन विजय ग्रंथाच्या पालखी मिरवणुकीने झाली. ढोल-ताशांच्या गजरात आणि “गण गण गणात बोते”च्या जयघोषात निघालेल्या पालखीने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
 
यानंतर श्रींच्या पादुकांचा अभिषेक, पूजन आणि महाआरती करण्यात आली. तसेच सामूहिक नामस्मरण, भजन आणि प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.
 
विशेष म्हणजे, भारताबाहेरील पहिले श्री गजानन महाराज मंदिर अमेरिकेतील न्यू ब्रन्सविक, न्यू जर्सी येथे उभारण्यात आले आहे. ऋषिजी मुद्गल, सीमाजी मुद्गल आणि अमेरिकेतील गजानन महाराज भक्त परिवार यांच्या प्रयत्नांतून हे मंदिर साकार झाले. हे मंदिर परदेशात भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि श्री गजानन महाराजांची भक्ती जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे.
 
मंदिराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्याची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंदिराचा विशेष गौरवही केला आहे.
 
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात विशाल आणि गौरी कुर्हेकर तसेच कनेक्टिकटमधील गजानन महाराज भक्त परिवाराचा मोलाचा सहभाग लाभला. स्वयंसेवक आणि सेवेकऱ्यांनी केलेल्या समर्पित सेवेमुळे हा सोहळा अधिक भव्य आणि संस्मरणीय ठरला.
 
भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कनेक्टिकटमधील हा धार्मिक सोहळा अविस्मरणीय ठरला. भविष्यातही अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन होत राहावे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.