गॅस गळतीने भीषण आग; घर जळून खाक, लाखोंचे नुकसान

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
ढाणकी, 
fire-caused-by-gas-leak : शहरातील गुणाजी चौक येथील शेख आलम शेख हुसेन यांच्या घरामध्ये बुधवारी रात्री 8.30 ते 9 च्या दरम्यान घरगुती गॅस गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य, फर्निचर, कपडे, धान्य व इतर मौल्यवान वस्तू जळून खाक झाल्याने मोठी हानी झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कुटुंबीय थोडक्यात बचावले.
 
 

gas 
 
 
 
या घरामध्ये गॅस गळती झाल्याने अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज परिसरात दूरवर ऐकू गेला. त्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आग इतक्या वेगाने पसरली की घरातील साहित्य बाहेर काढण्यासही वेळ मिळाला नाही. परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता जास्त असल्याने अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आले.
 
 
उमरखेड येथील अग्निशमन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. त्यांच्या प्रयत्नांमुळे आग शेजारील घरांपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यात यश आले.
 
 
दरम्यान, स्थानिक नागरिकांमध्ये ढाणकी नपंच्या अग्निशमन व्यवस्थेबाबत संताप व्यक्त होत आहे. नगर पंचायतकडे नुकतीच नवीन अग्निशमन गाडी आलेली असतानाही ती वेळेवर घटनास्थळी पोहोचूच शकली नाही किंवा उपलब्धच झाली नाही.
आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक स्तरावर अग्निशमन सेवा तत्काळ उपलब्ध होणे आवश्यक असताना नागरिकांना बाहेरील शहरातील अग्निशमन दलावर अवलंबून राहावे लागल्याने विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
 
या घटनेमुळे शहरातील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नपं प्रशासनाकडे अग्निशमन यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
 
 
तसेच घरगुती गॅसचा वापर करताना नागरिकांनी नियमित तपासणी करावी, गॅस गळतीचा संशय आल्यास तत्काळ खबरदारी घ्यावी आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 
 
या आगीत झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्याचे काम सुरू असून नेमकी वित्तहानी किती झाली याचा अंदाज अद्याप समोर आलेला नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.