नवी दिल्ली,
Firing outside Guru Randhawa's gym राजधानी दिल्लीत प्रसिद्ध पंजाबी गायक गुरू रंधावा यांच्या मालकीच्या जिमबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तींनी जिमच्या परिसरात गोळ्या झाडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी सुरक्षा वाढवली आहे.घटनेनंतर सोशल मीडियावर काही पोस्ट आणि कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. या माध्यमातून कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हायरल ऑडिओमध्ये गुरू रंधावा यांचे अभिनेता सलमान खान यांच्याशी असलेले संबंध हेच हल्ल्यामागचे कारण असल्याचे सांगितले जात असल्याची चर्चा आहे. तसेच हा हल्ला केवळ इशारा असून पुढे आणखी गंभीर कारवाया होऊ शकतात, असा दावा देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे.

माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि व्हायरल संदेशांची पडताळणी केली जात आहे. गोळीबारामागे खरोखरच एखादी गुन्हेगारी टोळी आहे की केवळ दहशत निर्माण करण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर करण्यात आला आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, सोशल मीडियावर फिरत असलेल्या पोस्ट आणि ऑडिओ क्लिप्सची सत्यता तपासल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.