ब्रम्हपुरी,
bramhapuri accident ब्रम्हपुरी शहरापासून जवळच असलेल्या पारडगाव येथील निलगिरी बार समोरील नाल्यात गिट्टीने भरलेला हायवा ट्रक कोसळून झालेल्या भीषण अपघातात चालक व वाहकाचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात गुरुवार, 11 जून रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चालक सुरेश आनंद भुरले (33, रा. मांडळ, ता. लाखांदूर, जि. भंडारा) आणि वाहक अमित देवराव कुमरे (29, रा. इरवा, ता. चिमूर, जि. चंद्रपूर) अशी मृतकांची नावे आहेत. हायवा ट्रक (40 सीडी 9002) गिट्टीने भरून जात असताना चालकाला अचानक झोपेची डुलकी आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हायवा रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात कोसळला. अपघातानंतर ट्रकची समोरील केबिन चकनाचूर झाली. या भीषण अपघातात चालक सुरेश भुरले आणि वाहक अमित कुमरे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.bramhapuri accident हायवाची केबिन पूर्णपणे चकनाचूर झाल्याने मृतदेह बाहेर काढणे अत्यंत आव्हानात्मक ठरले. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानंतर दोन्ही मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत. तसेच अपघातग्रस्त हायवा नाल्यातून बाहेर काढण्याचे काम सुरू असून, पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.