चारगाव फाट्याजवळ भीषण अपघात

दुचाकीस्वार ठार : संतप्त ग्रामस्थांचा चक्काजाम

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी,
accident : गडचांदूरवरून अमरावतीला जाणाèया एसटी बस आणि दुचाकीचा चारगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार रवींद्र मालेकर (वय 50, शेलू) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून संतप्त ग्रामस्थांनी मृतकाच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन केले आहे.
 
 
 
accident
 
 
 
रवींद्र मालेकर हे आपल्या लहान मुलीसह दुचाकीने प्रवास करीत होते. यावेळी कोरपना मार्गाकडून येणाèया एसटी बसच्या मागील चाकाखाली ते आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेली मुलगी मात्र सुदैवाने थोडक्यात बचावली.
 
 
 
घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातास रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित ट्रकचालक व मालकावर कारवाई करण्यात यावी, तसेच मृतकाच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
 
 
या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी चारगाव फाट्याजवळ चक्काजाम केल्याने मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
 
 
पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणल्या गेली. या दुर्दैवी घटनेमुळे शेलू व परिसरात हळहळ असून मृतकाच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.