नवी दिल्ली,
India outraged after Oman attack ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त करत अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांना तातडीने परराष्ट्र मंत्रालयात बोलावले आहे. या घटनेत भारतीय खलाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने भारताने अधिकृत निषेध नोंदवला असून, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. घडामोडींनंतर अमेरिकेनेही प्रतिक्रिया देत भारतासोबत सातत्याने संपर्क सुरू असल्याचे स्पष्ट केले. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगत दोन्ही देशांदरम्यान या विषयावर संवाद सुरू असल्याचे अमेरिकन प्रशासनाने नमूद केले.
हल्लाग्रस्त जहाजावर एकूण २४ भारतीय कर्मचारी कार्यरत होते. बचाव मोहिमेदरम्यान २१ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी तीन भारतीय खलाशी अद्याप बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी स्थानिक यंत्रणा आणि भारतीय दूतावास समन्वयाने काम करत आहेत. ओमानमधील भारतीय दूतावासाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा निषेध करत पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.
अशा घटनांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी वाहतूक, व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे भारताने स्पष्ट केले. तसेच सर्व संबंधित पक्षांनी तातडीने तणाव कमी करून राजनैतिक मार्गाने तोडगा काढावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच परिसरात अडचणीत सापडलेल्या दुसऱ्या एका व्यापारी जहाजावरील सर्व भारतीय खलाशांची सुखरूप सुटका करण्यात आली होती. त्या वेळी ओमानच्या प्रशासनाने केलेल्या मदतीबद्दल भारताने आभार व्यक्त केले होते. मात्र नव्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा सागरी सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, बेपत्ता भारतीयांचा शोध लागेपर्यंत या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहणार आहे.