18 अमेरिकी तळांवर इराणचा जबरदस्त हल्ला

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Iran's attack on 18 US bases पश्चिम आशियातील अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने भीषण वळण घेतले असून दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाया झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणवर तब्बल 49 क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे, तर प्रत्युत्तरादाखल इराणने कुवेत, बहरीन आणि इराकमधील 18 अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे.या संघर्षामुळे आखाती प्रदेशात तणाव शिगेला पोहोचला असून अनेक देशांनी आपत्कालीन उपाययोजना सुरू केल्या आहेत. कुवेत आणि बहरीनमध्ये सुरक्षा सतर्कता वाढवण्यात आली असून काही भागांमध्ये सायरन वाजवण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे.
 
 

Iran 
 
या घडामोडींमध्ये सर्वात मोठा धक्का म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यात आल्याची घोषणा. जगातील सुमारे 30% तेलवाहतूक या मार्गातून होत असल्याने जागतिक बाजारपेठांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तेलाच्या किमतींमध्ये 100 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास चढउतार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.दरम्यान, या संघर्षाचा परिणाम सागरी सुरक्षेवरही झाला असून ओमान किनाऱ्याजवळ झालेल्या एका हल्ल्यात 24 भारतीय कर्मचाऱ्यांपैकी 21 जणांना वाचवण्यात आले, तर 3 भारतीय अद्याप बेपत्ता आहेत. शोधमोहीम सुरू असून भारत सरकार आणि स्थानिक यंत्रणा संयुक्तपणे कार्यरत आहेत.
 
अमेरिकेकडून सुरू असलेल्या कारवायांना प्रत्युत्तर देताना इराणने अनेक लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचे सांगितले जात आहे. इराणच्या अधिकाऱ्यांनी कठोर इशारे देत “पुढील कारवाई आणखी तीव्र असेल” असे म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांनीही या संघर्षावर चिंता व्यक्त केली असून दोन्ही देशांना तातडीने शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास हा संघर्ष अधिक व्यापक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.