प्रेयसीच्या नादात आणि पैशांच्या मोहात विद्यार्थी बनला चोर

- दुचाकी चोरीचे ४ गुन्हे उघडकीस

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
नागपूर,
student-thief : अभ्यासात हुशार असलेला एक विद्यार्थी झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी आणि प्रेयसीवर खर्च करण्यासाठी गुन्हेगारी मार्गाकडे वळला. एकामागे एक त्याने दुचाकी चोरी करण्याचा सपाटा लावला. हँडललॉक नसलेल्या दुचाकींना तो लक्ष्य करीत होता. मात्र कळमना पोलिसांनी ठाण्यांतर्गत वाहन चोरीच्या एका गुन्ह्याचा छडा लावून त्याला अटक केली. त्याच्याकडून ४ चोरीच्या ॲक्टिव्हा दुचाकी जप्त करण्यात आल्या. निलेश छगन देवगडे (२०, रा. गुलमोहरनगर, कळमना) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
 

bgp 
 
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे रोजी नेताजीनगर परिसरातून घरासमोर उभी दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार कळमना पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. सलग घडणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांमागे एकाच व्यक्तीचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून निलेशला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने कळमना आणि लकडगंज पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून चार दुचाकी वाहन चोरी केल्याचे कबूल केले. आरोपीची चोरी करण्याची पद्धतही वेगळी होती. तो प्रामुख्याने लॉक नसलेल्या दुचाकी हेरत असे. वाहन चोरी केल्यानंतर काही अंतर ते हाताने ढकलत नेत असल्याने संशय येत नव्हता. सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानंतर वाहन सुरू करून तो पसार होत होता. या पद्धतीमुळे तो बराच काळ पोलिसांच्या नजरेतून बचावला होता.
 
 
पार्टी आणि प्रयेसीचा मोह नडला
 
 
पोलिस तपासात बारावी सायन्समध्ये प्रथम श्रेणीत पास झालेला निलेश हा अभ्यासात हुशार असूनही चुकीच्या संगतीमुळे, महागड्या शौकांमुळे आणि सहज पैसा मिळविण्याच्या लालसेमुळे गुन्हेगारीकडे वळल्याचे समोर आले आहे. त्याच्या प्रेयसीने त्याला वारंवार महागडे गिफ्ट आणि बाहेर फिरायला जाण्यासाठी हट्ट धरला. त्यामुळे त्याने चोरीचा मार्ग पत्करला. त्याच्याकडून सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीच्या ४ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई ठाणेदार प्रवीण काळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.