भीषण अपघातांच्या मालिकेमुळे संपूर्ण राज्य हादरले

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
मुंबई
Maharashtra road accidents  महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत विविध जिल्ह्यांमध्ये घडलेल्या भीषण अपघातांच्या मालिकेमुळे संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. चंद्रपूर, वाशिम, भंडारा, पालघर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये घडलेल्या घटनांमध्ये कार नदीत कोसळणे, बस अपघात, डंपर पलटी होणे आणि हिट अँड रनसारख्या गंभीर घटनांचा समावेश आहे. या अपघातांमुळे अनेक जण जखमी झाले असून काही ठिकाणी जीवितहानीही झाली आहे. परिणामी, राज्यातील रस्ते सुरक्षेचा आणि वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर चर्चेत आला आहे.
 

Maharashtra road accidents 

कुठे झाले अपघात
चंद्रपूर शहरालगत इरई नदी पुलावर अतिवेगाने जात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट लोखंडी कठडा तोडून नदीपात्रात कोसळली. या अपघातात कारमधील पाच प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पुलावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.
भंडारा जिल्ह्यातील खापा चौक परिसरात तुमसर-रामटेक महामार्गावर अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हिमांशु पटले (वय २६) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर चालक वाहनासह फरार झाला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून महामार्ग रोखला आणि आर्थिक भरपाईची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या आंदोलनानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला.
वाशिम जिल्ह्यात हिंगोली Maharashtra road accidents ते अकोला मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला तोंडगाव फाट्याजवळ अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उतरली. या घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रेनच्या मदतीने बस रस्त्यावरून हटविण्याचे काम करण्यात आले.
 
 
पालघर जिल्ह्यात सिन्नर महामार्गावरील गोवाडे गावाजवळ डंपर उलटल्याची घटना घडली. चालक किरकोळ जखमी झाला असून या मार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अरुंद रस्ता आणि धोकादायक वळणांमुळे या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.
परभणीच्या गंगाखेड शहरात परळी रोड परिसरात चालत्या कारचा टायर अचानक निखळल्याने भीषण अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला आदळली. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमींना परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या सलग अपघातांमुळे राज्यातील रस्ते सुरक्षा, वाहनांची स्थिती आणि वाहतूक शिस्त यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून कडक उपाययोजना आणि रस्ते सुधारणा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.