मुंबई,
Mahi Vij टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री माही विज हिने तिचा माजी पती जय भानुशालीसोबतच्या वैवाहिक आयुष्याबाबत आणि त्यांच्या कुटुंबाशी संबंधित एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तिने लग्नाच्या वेळी सासरच्या कुटुंबाकडून कोणतीही मागणी करण्यात आली नव्हती, असा अनुभव सांगितला असून तिच्या या विधानाची सध्या मनोरंजन विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे.
माही विज आणि जय भानुशाली यांनी सुमारे १४ वर्षांच्या संसारानंतर २०२६ च्या सुरुवातीला घटस्फोट घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दोघांनीही आपापल्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोकळेपणाने भाष्य केले असून, सध्या ते मुलांच्या संगोपनासाठी सहपालकत्व (co-parenting) पद्धतीने जबाबदाऱ्या पार पाडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अलीकडील चर्चेत माहीने सांगितले की, लग्नाच्या वेळी जेव्हा तिने स्वतः जयच्या आई-वडिलांना विचारले की त्यांची काही अपेक्षा किंवा मागणी आहे का, तेव्हा त्यांनी कोणतीही भौतिक मागणी न करता केवळ कुटुंबाचा भाग होण्याचे सांगितले होते. “फक्त आमच्या घरी ये आणि आमच्या कुटुंबाचा भाग हो,” असे उत्तर मिळाल्याचे तिने नमूद केले. या अनुभवामुळे आपण स्वतःला भाग्यवान समजते, असेही माहीने स्पष्ट केले.
दरम्यान, घटस्फोटानंतरही Mahi Vij माही आणि जय यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध कायम असल्याचे दोघांनी विविध मुलाखतींमधून सांगितले आहे. त्यांच्या तीन मुलांच्या जबाबदाऱ्या दोघेही संयुक्तपणे पार पाडत असून मुलांच्या कल्याणाला त्यांनी प्राधान्य दिले आहे.माही विज आणि जय भानुशाली हे एकेकाळी टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे मानले जात होते. त्यांच्या नात्यातील दुराव्यानंतरही दोघांनी परस्परांबाबत आदर राखत नवे आयुष्य स्वीकारल्याचे चित्र दिसत आहे. माहीच्या या ताज्या विधानामुळे त्यांच्या नात्याच्या विविध पैलूंवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.