मान्सूनची गाडी रुळांवरून घसरली पावसाला ‘ब्रेक'

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
पुणे
monsoon Maharashtra delay राज्यात मोसमी वाऱ्यांच्या आगमनानंतर अपेक्षित असलेली पुढील प्रगती मंदावल्याचे चित्र समोर आले आहे. प्रचलित वेळापत्रकानुसार १० जूनपर्यंत मान्सून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो, मात्र यंदा ही प्रगती थांबल्याचे निरीक्षण भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेकडून नोंदवण्यात आले आहे. आवश्यक बाष्प आणि पुरेशी शक्तीचा अभाव, तसेच वातावरणातील अनुकूलतेची कमतरता यामुळे मान्सूनची आगेकूच थांबली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. पुढील तीन ते चार दिवसांत परिस्थितीत सुधारणा होऊन मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
 

monsoon Maharashtra delay 
यंदा मोसमी वाऱ्यांनी तळकोकणात अपेक्षेपेक्षा एक दिवस आधी, म्हणजे ६ जून रोजी प्रवेश केला होता. सामान्यतः ७ जूनला तळकोकणात मान्सून दाखल होतो. या प्रारंभिक प्रगतीमुळे मध्य महाराष्ट्रातही वेळेत पाऊस होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, त्यानंतर मान्सूनची गती कमी झाल्याने ही अपेक्षा पूर्ण होऊ शकलेली नाही. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार सध्या राज्यातील बहुतांश भागांत पडणारा पाऊस हा पूर्वमोसमी स्वरूपाचा आहे.
 
 
पुणे वेधशाळेतील monsoon Maharashtra delay  शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार मान्सूनच्या पुढील प्रगतीला अडथळा ठरतील असे ठोस वातावरणीय घटक सध्या सक्रिय नाहीत. मात्र, मान्सूनला उत्तरेकडे सरकण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा आणि आर्द्रता पुरेशा प्रमाणात तयार झालेली नाही. त्यामुळे वाऱ्यांची गती मंदावली असून पावसाची तीव्रताही तुलनेने कमी झाली आहे.या पार्श्वभूमीवर यंदा एल निनोचा प्रभाव असल्याने मान्सूनच्या वर्तनात अस्थिरता दिसून येत असल्याचेही तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. तथापि, दरवर्षीचा मान्सून वेगळा असतो आणि त्याची प्रगती हवामानातील स्थानिक व प्रादेशिक बदलांवर अवलंबून असते, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी मान्सून पुणे-मुंबईत तुलनेने उशिरा, २४ जून रोजी दाखल झाला होता आणि संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी लागला होता.दरम्यान, राज्यातील पावसाच्या स्थितीत मोठी तूट नोंदवली गेली आहे. १ ते १० जून या कालावधीत पुणे जिल्ह्यात सरासरी ४७.८ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत केवळ १३.९ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला असून, सुमारे ७१ टक्के घट झाली आहे. राज्यस्तरावरही या कालावधीत सरासरी ४०.३ मिलिमीटरच्या तुलनेत १७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, एकूण ५६ टक्के तूट दिसून येत आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अद्याप पावसाची नोंदच झालेली नसल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक असल्याचे स्पष्ट झाले आहे.पुढील काही दिवस मान्सूनच्या हालचालींसाठी निर्णायक ठरणार असून, त्याच्या पुनरुज्जीवनावर राज्यातील पावसाची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.