नागपूर,
mpsc-exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा प्रक्रियेतील एका नियमामुळे काही उमेदवारांना पेपर सुरू होण्यापूर्वीच अतिरिक्त वेळ मिळत असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रविवार, १४ जून रोजी होणाऱ्या महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी आयोगाकडे या बाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
एमपीएससीच्या नियमानुसार, परीक्षेची वेळ सुरू होण्याच्या तीन मिनिटे आधी प्रत्येक उमेदवाराला प्रश्नपत्रिका दिली जाते. या कालावधीत उमेदवारांनी प्रश्नपत्रिकेचा क्रमांक उत्तरपत्रिकेवर नोंदवायचा असतो. मात्र, प्रत्यक्षात अनेक परीक्षा केंद्रांवर काही उमेदवार या वेळेतच प्रश्नपत्रिकेचे सील उघडून प्रश्न वाचण्यास किंवा पेपर सोडवण्यास सुरुवात करतात, अशी तक्रार आहे.
उदाहरणार्थ, सकाळी ११ वाजता परीक्षा सुरू होणार असल्यास प्रश्नपत्रिका १०.५७ वाजता उमेदवारांच्या हातात दिली जाते. नियमांचे काटेकोर पालन करणारे उमेदवार मात्र ११ वाजताच सील उघडतात. परिणामी, काहींना तीन मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळत असल्याने स्पर्धात्मक परीक्षेत समान संधीच्या तत्त्वाला धक्का बसत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर प्रश्नपत्रिकेचे सील निर्धारित वेळेपूर्वी उघडू नये यासाठी पर्यवेक्षकांनी अधिक कडक भूमिका घ्यावी आणि नियमांचे कठोर पालन सुनिश्चित करावे, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, आयोगाने परीक्षेसंदर्भात अन्य नियमही स्पष्ट केले आहेत. आंदोलने, वाहतूक कोंडी, अतिवृष्टी किंवा अन्य अडचणी लक्षात घेता उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर किमान दीड तास आधी पोहोचणे आवश्यक आहे. तसेच, परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी स्वतःच्या आसनावर उपस्थित राहणे बंधनकारक राहील. अंतिम प्रवेश वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची प्रवेशपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, परीक्षेसाठी मूळ प्रिंट केलेले प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.