अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur double murder सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी बाजारातील कमला नेहरु कॉलेजसमोर दुचाकीने आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळीने दोन युवकांवर चाकू आणि दगडांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज बुधवारी रात्री आठ वाजता घडली. या दुहेरी हत्याकांडाने उपराजधानी हादरली असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आदित्य ऊर्फ सोनू भोंडवे (२५, सोमवारी क्वार्टर) आणि आदित्य राहूलकर (२३) अशी खून झालेल्या युवकांची नावे आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून उपराजधानीत हत्याकांडाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही हत्याकांड गँगवार आणि जुन्या वैमनस्यातून घडले आहेत. Nagpur double murder मृतांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे पोलिसांच्या गस्त प्रणालीवर संशय निर्माण झाला आहे. बुधवारी रात्री आठ वाजता तीन दुचाकींवर पाच ते सहा युवक हातात तलवार-चाकू घेऊन बुधवारी बाजारातील कमला नेहरु महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आले. त्यांनी सोनू भोंडवे आणि आदित्य राहूलकर यांना घेराव घातला. त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही क्षणातच आरोपींनी पाठीमागे लपवलेली धारदार शस्त्रे काढून आदित्य राहूलकर आणि आदित्य भोंडवे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही जीव वाचविण्यासाठी पळायला लागले. मात्र, आरोपींनी दोघांचाही पाठलाग करुन भरचौकात दोघांचाही खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर सक्करदरा पोलिस घटनास्थळावर पोहचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन मेडिकलला रवाना केले. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे.
बघ्यांची गर्दी अन् भरचौकात खून
हे दुहेरी हत्याकांड बुधवारी बाजारात घडले. त्यामुळे बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी बरीच मोठी गर्दी होती. आरोपींनी तलवार-चाकू काढून दोन्ही युवकांवर हल्ला केला. त्यावेळी बाजारात उपस्थित जवळपास ४० ते ५० जणांनी हे हत्याकांड डोळ्यांनी बघितले. दोनही युवकांचा खून केल्यानंतर आरोपी नागरिकांना धमकावून पळून गेले.
हत्याकांड सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद
सोनू भोंडवे आणि आदित्य Nagpur double murder राहुलकर हत्याकांड बाजारातील काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. आरोपींचे चेहरे आणि वाहनांच्या नंबर प्लेटवरुन आरोपींची माहिती काढण्यात येत आहे. पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पोलिस आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत. हे दुहेरी हत्याकांड गँगवॉरमधून घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
.......