नवी दिल्ली,
Opendoor's major decision अमेरिकेतील रिअल इस्टेट टेक कंपनी ओपनडोअर टेक्नॉलॉजीजने भारतातील आपले कामकाज बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सुमारे 250 कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार असून कंपनीने याला आपल्या व्यवसाय पुनर्रचना धोरणाचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे.कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी काझ नेजातियान यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून दिलेल्या संदेशात सांगितले की, ओपनडोअरचे बहुतेक ग्राहक अमेरिकेत असल्यामुळे कामकाजही तिथेच केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतातील काही जबाबदाऱ्या टप्प्याटप्प्याने अमेरिकेत हलवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि आता ती पूर्ण केली जात आहे.

सीईओंच्या म्हणण्यानुसार, पूर्वी भारतात मोठ्या प्रमाणावर मॅन्युअल प्रक्रियांवर आधारित काम केले जात होते. मात्र तंत्रज्ञानातील बदल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणालींचा वापर वाढल्यामुळे या कामांची गरज कमी झाली आहे. त्यामुळे ऑपरेशन्स अधिक कार्यक्षम करण्यासाठी अमेरिकेतच टीम मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नेजातियन यांनी हेही स्पष्ट केले की, हा निर्णय भारतीय कर्मचाऱ्यांच्या कामगिरीशी संबंधित नाही. त्यांनी भारतातील कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांना कुशल आणि प्रतिभावान व्यावसायिक असे संबोधले. प्रभावित कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत, सेवा समाप्ती पॅकेज आणि नोकरी शोधण्यासाठी सहाय्य दिले जाणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे. कंपनीने पुढे सांगितले की कर्मचारी कपात झाली असली तरी त्यांच्या एकूण व्यवसाय धोरणात कोणताही बदल नाही. अमेरिकन बाजारावर लक्ष केंद्रित करत कंपनी प्रक्रिया सुलभ करणे आणि तंत्रज्ञानाधारित प्रणाली मजबूत करण्यावर भर देत आहे.