पाकमध्ये १६ निःशस्त्र लोकांवर एके-४७चा मारा!

पाक लष्कराच्या कारवाईने संताप

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
रावळकोट,
Outrage over Pakistan Army's action पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट शहरात शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. स्वस्त अन्नधान्य, परवडणारी वीज आणि मूलभूत नागरी हक्कांच्या मागण्यांसाठी हजारो नागरिक ईदगाह मैदानावर एकत्र आले होते. मात्र, आंदोलनादरम्यान पाकिस्तानी सुरक्षा दलांनी जमावावर गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेत किमान १६ जणांचा मृत्यू झाला, तर ३७ हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, आंदोलनात मोठ्या संख्येने महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर सुरक्षा दलांनी कारवाई केल्याचे सांगितले जात असले तरी आंदोलकांचा दावा आहे की कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार करण्यात आला. घटनेनंतर रावळकोट परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
 

paksitaa 
गोळीबारानंतर अनेक भागांमध्ये निषेध मोर्चे काढण्यात आले. बाजारपेठा बंद ठेवून नागरिकांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनांदरम्यान मृतांचा आकडा वाढत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष तीव्र झाला आहे.आंदोलनाचे नेते सरदार अमन खान यांनी या घटनेचा निषेध करत संघर्ष मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले. नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक हक्कांसाठी लढा सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून परिस्थितीवर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. या घटनेमुळे पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, परिसरात तणाव कायम आहे.