पुणे
Pune cyber crime raid आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या पूर्व भागात बुधवारी दुपारपासून सुरू झालेली आणि गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत चाललेली पोलिसांची अत्यंत गुप्त आणि मोठ्या प्रमाणातील कारवाई शहरभर चर्चेचा विषय ठरली आहे. हडपसरमधील नामांकित ‘अॅमनोरा’ परिसरातील ‘अपेक्स’ कॉल सेंटर तसेच फुरसुंगी येथील ‘इन्फोसिटी’मधील आणखी एका हायटेक कॉल सेंटरवर पुणे पोलिसांनी छापेमारी केल्याने आयटी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
या कारवाईसाठी परिमंडळ सहा आणि सायबर पोलिसांच्या संयुक्त पथकातील सुमारे २०० हून अधिक पोलीस अधिकारी आणि अंमलदारांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. अचानक आणि समन्वयित पद्धतीने दोन्ही ठिकाणांना चारही बाजूंनी वेढा घालण्यात आला आणि दुपारपासून सुरू झालेली ही कारवाई रात्री उशिरापर्यंत, तब्बल १० ते १२ तास अखंड सुरू राहिली.
ही छापेमारी साधी नसून Pune cyber crime raid यामागे काही मोठे सायबर रॅकेट किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाची फसवणूक साखळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे या कारवाईचे नेमके स्वरूप काय, कॉल सेंटर्समध्ये काय आढळले आणि कोणावर कारवाई झाली, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा उतरवून केलेल्या या छापेमारीमुळे पुणेकरांमध्ये आणि आयटी क्षेत्रात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काहींनी ही कारवाई सायबर फसवणुकीशी संबंधित असल्याचा अंदाज व्यक्त केला असून, काहीजण यामागे आणखी गंभीर स्वरूपाचा प्रकार असू शकतो, अशी शक्यता वर्तवत आहेत.पोलिसांनी सध्या संपूर्ण प्रकरणाबाबत कमालीची गोपनीयता पाळली असून तपासाच्या दृष्टीने कोणतीही माहिती उघड करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ‘रात्रीभर चाललेल्या छाप्याचे’ सत्य लवकरच समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.