‘ग्रोथ हब’ प्रकल्पाला नवे बळ विकासाला चालना

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
पुणे
Pune Growth Hub project पुणे महानगर प्रदेशाला देशातील महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांपैकी एक म्हणून विकसित करण्याच्या दिशेने केंद्र सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. ‘ग्रोथ हब’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल ५,००० कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला असून, पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने हा निधी पायाभूत सुविधा, औद्योगिक विस्तार आणि आर्थिक विकासाच्या विविध प्रकल्पांवर खर्च केला जाणार आहे.
 

Pune Growth Hub project 
 
पुणे, पिंपरी-चिंचवड, छावणी क्षेत्रे आणि आसपासच्या औद्योगिक पट्ट्यांचा समावेश असलेला सुमारे ६,९१४ चौरस किलोमीटरचा विस्तृत परिसर या ‘ग्रोथ हब’च्या कक्षेत येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे महानगर प्रदेशाला तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि नवोन्मेष यांचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या उपक्रमासाठी नीती आयोग, महाराष्ट्र शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्यात समन्वय साधण्यात आला असून, एकत्रितपणे सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, या प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ शहरी पायाभूत सुविधाच नव्हे तर संपूर्ण प्रादेशिक आर्थिक संरचनेत बदल घडवून आणण्याची क्षमता आहे.
 
 
सध्या पुणे महानगर Pune Growth Hub project  प्रदेशात वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा आणि पर्यावरणीय समस्या यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ‘ग्रोथ हब’ प्रकल्पामुळे मेट्रो विस्तार, रस्ते जाळ्याचे बळकटीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, औद्योगिक कॉरिडॉरचा विकास आणि नव्या रोजगारनिर्मितीला मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या योजनेअंतर्गत एकूण गुंतवणूक सुमारे ८०,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून, त्यामध्ये सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील काही वर्षांत हा प्रदेश माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, उत्पादन आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील जागतिक केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकल्पामुळे पुण्याच्या आर्थिक वाढीला गती मिळून रोजगारनिर्मितीच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, तसेच शहर आणि ग्रामीण भागातील विकासातील दरी कमी होण्यास मदत होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.