अहमदनगर
Ralegan Siddhi ग्रामविकासाच्या आदर्श मॉडेलमुळे देशभरात ओळख निर्माण केलेल्या राळेगणसिद्धी गावाला भारतीय लष्कराकडून एक ऐतिहासिक आणि विशेष सन्मान देण्यात आला आहे. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये वापरण्यात आलेला T-55 हा ऐतिहासिक रणगाडा लष्कराकडून या गावाला भेट म्हणून प्रदान करण्यात आला असून, गावाच्या प्रेरणादायी वाटचालीचा हा नवा गौरव मानला जात आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली राळेगणसिद्धीने जलसंधारण, स्वच्छता, ग्रामविकास आणि सामाजिक शिस्त यांचा आदर्श देशासमोर ठेवला आहे. या कार्यामुळे गावाची राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख निर्माण झाली असून, त्याच योगदानाची दखल घेत भारतीय लष्कराने ही विशेष भेट दिल्याचे सांगितले जात आहे.या रणगाड्याला ‘शौर्यसिद्धी’ असे नाव देण्यात आले असून तो गावात शौर्य, देशभक्ती आणि राष्ट्रसेवेचे प्रतीक म्हणून उभारण्यात येणार आहे. लवकरच या रणगाड्याचे अनावरण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आहे. या प्रसंगी ग्रामस्थ, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील Ralegan Siddhi मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.रणगाड्याच्या स्थापनेमुळे राळेगणसिद्धी हे गाव केवळ ग्रामविकासाच्या आदर्शासाठीच नव्हे, तर देशभक्ती आणि लष्करी शौर्याच्या प्रेरणास्थान म्हणूनही अधिक ओळखले जाणार आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना आणि विद्यार्थ्यांना भारतीय लष्कराच्या इतिहासातील शौर्यगाथांचा प्रत्यक्ष परिचय होणार असून, गावाच्या प्रेरणादायी ओळखीला नवा आयाम मिळणार आहे.