जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल कॅम्पला प्रारंभ

जिल्हा वकील संघाच्या पाठपुराव्याला यश

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
बुलढाणा, 
revenue-camp : जिल्ह्यातील वकील, पक्षकार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. जिल्हा वकील संघ, बुलढाणा यांनी महसूल विषयक प्रकरणांच्या सुनावणीसाठी जिल्हा स्तरावर विशेष व्यवस्था करण्याची केलेली मागणी अखेर मान्य झाली असून, दि. ११ जून पासून विभागीय अप्पर आयुक्त वाघमारे यांच्या समोर जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथे महसूल कॅम्पला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली आहे.
 
 
 
revenue-camp
 
 
 
या कॅम्पच्या माध्यमातून विभागीय आयुक्त, अमरावती यांच्याकडे दाखल असलेल्या महसूल तसेच विविध प्रकारच्या अपील, पुनर्विलोकन आणि इतर प्रशासकीय प्रकरणांची सुनावणी आता जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथेच पार पडणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना, शेतकर्‍यांना तसेच वकिलांना सुनावणी साठी अमरावती येथे वारंवार जावे लागणार नाही. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठ्या प्रमाणात बचत होणार असून न्यायप्रक्रियेला देखील गती मिळणार आहे.
 
 
जिल्हा वकील संघाने गेल्या अनेक दिवसांपासून या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न केले होते. जिल्ह्यातील पक्षकारांना अमरावती येथे जाण्यासाठी होणारा आर्थिक व मानसिक त्रास, प्रवासाचा खर्च तसेच वेळेचा अपव्यय याकडे संघाने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या मागणीची दखल घेत प्रशासनाने बुलढाणा येथे महसूल कॅम्प आयोजित करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील कायदे क्षेत्रात समाधान व्यक्त केले जात आहे.महसूल कॅम्पमुळे प्रलंबित प्रकरणां च्या सुनावण्यांना वेग मिळणार असून, अनेक नागरिकांच्या समस्या स्थानिक पातळीवरच मार्गी लागण्यास मदत होणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय सावळे यांनी व्यक्त केले आहे. यामुळे महसूल विभागाशी संबंधित विविध प्रकरणांचा निपटारा अधिक प्रभावी आणि जलदगतीने होण्याची अपेक्षा आहे.
 
 
जिल्हा वकील संघाच्या एकजुटीने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळालेले हे यश जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकां साठी निश्चितच दिलासादायक ठरणारे आहे. महसूल कॅम्पच्या माध्यमातून न्यायप्रक्रिया अधिक सुलभ, गतिमान आणि नागरिका भिमुख होण्यास मोठी मदत होणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.