नवी दिल्ली,
Sharma performs Abhishek भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी युवा फलंदाज अभिषेक शर्मा अध्यात्माच्या रंगात रंगलेला दिसला. व्यस्त क्रिकेट वेळापत्रकातून थोडा वेळ काढत त्याने तामिळनाडूमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळाला भेट देत भगवान शिवाचे दर्शन घेतले. या भेटीचे काही खास फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले असून चाहत्यांकडून त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये अभिषेक शांत आणि ध्यानमग्न अवस्थेत दिसत आहे. मंदिर परिसरातील आध्यात्मिक वातावरणाने भारावून गेल्याचे त्याच्या पोस्टमधून जाणवते. मनःशांती आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवण्यासाठी प्रत्येकाने या पवित्र स्थळाला भेट द्यावी, असेही त्याने आपल्या चाहत्यांना आवाहन केले आहे.

मैदानावरील दमदार कामगिरीमुळे चर्चेत असलेल्या अभिषेकसाठी यंदाचा आयपीएल हंगाम विशेष ठरला. त्याने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करत संघासाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या. त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळेच आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात त्याची निवड झाली आहे. सध्या टी-२० क्रिकेटमधील आघाडीच्या फलंदाजांमध्ये गणला जाणारा अभिषेक आगामी दौऱ्यातही मोठी छाप पाडण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धांमध्येही तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता असल्याने चाहत्यांच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत. मैदानावर आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा युवा क्रिकेटपटू सध्या मात्र भक्ती आणि अध्यात्माच्या शांत वातावरणात रमल्याचे पाहायला मिळत आहे.