कारंजा
Karanja गावातील लेकरं बाहेर शहरात शिकायला गेले की त्यांना गावाविषयी एक वेगळी आत्मियता निर्माण होते. गावाविषयी ओढ निर्माण होते. शहरात असलेल्या शैक्षणिक बाबी आपल्याही गावात असाव्या असे वाटून जाते. नगर, महानगरात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण शिबिरं होतात. त्यासाठी प्रवेश शुल्कही आकारल्या जाते. मात्र, येथील खुशी महल्ले या अभियांत्रिकीला शिकणार्या विद्यार्थिनीने गावातील मुलासाठी एक आगळीवेगळी भेट आणली आणि उन्हाळ्याचा सुट्ट्यांचा आनंद लुटला.
युवक-युवतींमधील सर्जनशीलतेला वाव देतानाच उन्हाळी सुट्ट्यांचा वेळ आनंददायी करण्याच्या उद्देशाने शहरात प्रथमच ‘सिप अॅण्ड स्ट्रोक’ या अभिनव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाची संकल्पना रामदेव बाबा इंजिनिअरिंग कॉलेज, नागपूरची विद्यार्थिनी खुशी प्रेम महिले हिने मांडली. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये स्वतःचा आणि इतरांचा वेळ अधिक आनंददायी, सर्जनशील व संस्मरणीय कसा बनवता येईल, या विचारातून खुशीने सिप अॅण्ड स्ट्रोक ही संकल्पना साकारली. चित्रकलेच्या माध्यमातून व्यत होण्याची संधी, संवाद, मैत्री आणि कलात्मक अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम या उपक्रमामध्ये साधण्यात आला. तिने आपली कल्पना समाज माध्यमांच्या माध्यमातून नागरिकांसमोर मांडली. विशेष म्हणजे, अल्पावधीतच अपेक्षेपेक्षा अधिक नोंदणी झाल्याने या उपक्रमाबाबत तरुणांमध्ये असलेले आकर्षण स्पष्ट झाले.
कार्यक्रमादरम्यान सहभागी युवक-युवतींनी चित्रकलेचा आनंद घेत विविध विषयांवर आपली कलात्मकता कॅनव्हासवर साकारली. चित्रकलेसोबतच परस्पर संवाद, नवीन मैत्री आणि सकारात्मक वातावरणामुळे उपस्थितांनी या उपक्रमाचा आनंद लुटला. विशेष म्हणजे, लहान शहरामध्येही आधुनिक आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांना उत्तम प्रतिसाद मिळू शकतो, हे या उपक्रमाने सिद्ध केले. भविष्यात अशाच प्रकारचे कलात्मक, सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारे उपक्रम आयोजित करण्याचा मानस आयोजकांनी व्यत केला आहे. या संकल्पनेला यशस्वी करण्याकरिता मधुरा मेंघरे व पूर्वा मेंघरे यांनी सहकार्य केले.