अमरावती,
kirit-somaiya : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या जन्म व मृत्यू दाखले प्रकरणाच्या अनुषंगाने अमरावती महापालिका दौर्यावरून आज राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. सोमय्या यांच्या बैठकीला एमआयएम व शिवसेना उबाठाच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवत घोषणाबाजी केली. या सर्व प्रकारामुळे महापालिका परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
किरीट सोमय्या हे अमरावती महापालिकेत एका बैठकीसाठी येत असताना, इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ एमआयएम व शिवसेना उबाठा नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी त्यांची वाहने अडवली. ‘किरीट सोमय्या वापस जाओ’ अशा घोषणा देत काही आंदोलक थेट सोमय्या यांच्या वाहनासमोर रस्त्यावर आडवे झाले. सोमय्या यांच्या दौर्याच्या पृष्ठभूमीवर महापालिका परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, आंदोलक थेट गाडीसमोर झोपल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. अखेर पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला सारत सोमय्या यांना मार्ग करून दिला.
//‘एमआयएम’ आणि काँग्रेसा आक्षेप
किरीट सोमय्या हे सध्या कोणत्याही संवैधानिक पदावर कार्यरत नाहीत. त्यामुळे त्यांना महापालिकेत अधिकृत बैठक घेण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असा आक्षेप एमआयएमच्या नगरसेवकांनी घेतला. दुसरीकडे, युवक काँग्रेसने या प्रकरणी थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. अशा काळात शासकीय यंत्रणा, शासकीय कार्यालये आणि प्रशासकीय पदांचा गैरवापर करून राजकीय बैठक घेणे हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप त्यांनी केला. महापालिका आयुक्त आणि महापौरांच्या परवानगीने ही बैठक झाली असल्यास, त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने दिलाा आहे.
३५ ते ४० हजार दाखले बोगस : सोमय्या
अमरावती महापालिकेने जुन्या पद्धतीने दुरूस्तीच्या नावावर मागच्या वर्षी व चालू वर्षात एकूण ३५ ते ४० हजार दाखले दिले आहे. यातील बहुतांश दाखले बोगस आहे. त्या दाखल्याची पुन्हा तपासणी करणे आवश्यक आहे. या संदर्भात चौकशी करून १५ दिवसात माहिती द्यावी, अशी मागणी मनपा प्रशासनाकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली. इतक्या मोठ्या प्रमाणात दाखले कुठेच दिल्या गेले नाही, असेही त्यांनी नमुद केले. मनपाने याची चौकशी न केल्यास एसआयटी मार्फत चौकशी मागणी आपण राज्य शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी नमुद केले.
विरोधकाचे राजकीय नैराश्य : चेतन गावंडे
या सर्व घटनेवर महापालिकेतील सभागृह नेते चेतन गावंडे यांनी सत्ताधारी भाजपची बाजू मांडताना एमआयएम आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. हा विरोध म्हणजे केवळ राजकीय नैराश्याचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले. किरीट सोमय्या हे केवळ जन्म - मृत्यू दाखल्यांसारख्या नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांबाबत प्रशासनाकडून माहिती घेण्यासाठी आले होते. प्रशासनाची अनास्था जनतेसमोर येऊ नये, म्हणूनच हा जाणीवपूर्वक गोंधळ घालण्यात आला, असा आरोप गावंडे यांनी केला.