एसटी कर्मचाऱ्यांना सरकारची 'डबल गिफ्ट'

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
मुंबई,
st-employees-dearness-allowance : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा केली. या निर्णयाचा लाभ सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणार आहे. याशिवाय घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
st
 
 
मुंबई सेंट्रल येथील वाहतूक भवनमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी वेतन, भत्ते, सेवाशर्ती आणि इतर मागण्यांबाबत आपली मते मांडली. त्यावर सकारात्मक चर्चा करत अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दूरध्वनीद्वारे बैठकीत सहभागी होत कर्मचारी संघटनांना शुभेच्छा दिल्या. एसटी महामंडळ अधिक सक्षम आणि प्रवासीकेंद्रित करण्यासाठी सर्वांनी सामंजस्याने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
या बैठकीत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ मिळाल्यानंतर तो तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात येणार आहे. तसेच वेतनवाढीची थकबाकी आर्थिक परिस्थितीनुसार टप्प्याटप्प्याने देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत कर्मचारी संघटनांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
 
कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने संवाद साधण्यासाठी सर्व संघटनांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असलेली विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देशही देण्यात आले. ही समिती महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी उपाययोजना सुचवेल आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल.
 
दरम्यान, एसटीच्या आधुनिकीकरणावरही भर देण्यात येत आहे. आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक नवीन बसेस ताफ्यात दाखल झाल्या असून २०३५ पर्यंत संपूर्ण एसटी ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्यभर चार्जिंग स्टेशन उभारण्याचे कामही हाती घेण्यात येणार आहे.
 
बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यभर विशेष मोहीम सुरू असल्याचेही सरनाईक यांनी सांगितले. या मोहिमेमुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होत असून पुढील काळात ही कारवाई अधिक तीव्र केली जाणार आहे.
 
एसटी कर्मचारी, प्रशासन आणि शासन यांच्या समन्वयातून महामंडळ अधिक सक्षम, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि प्रवासीहिताचे बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास प्रतापराव सरनाईक यांनी व्यक्त केला.