तस्करी: द स्मगलर्स वेब’ने ओटीटीवर घातला धुमाकूळ

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
मुंबई
Taskaree ओटीटी प्लॅटफॉर्मवर गेल्या काही महिन्यांपासून सस्पेन्स आणि क्राईम थ्रिलर प्रकारातील मालिकांची मोठी चलती पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारातील ‘तस्करी: द स्मगलर्स वेब’ ही नवी वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून ट्रेंडिंग यादीत सातत्याने स्थान टिकवून ठेवत आहे.
 
Taskaree
 
सात भागांच्या या मालिकेत सस्पेन्स, हेरगिरी आणि क्राईम ड्रामाचा प्रभावी संगम पाहायला मिळतो. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) परिसरात घडणाऱ्या कथानकावर आधारित ही मालिका प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे.
या मालिकेत इमरान हाश्मी यांनी कस्टम्स अधिकाऱ्याची मुख्य भूमिका साकारली असून ते ‘अर्जुन मीना’ या प्रामाणिक आणि कुशल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसतात. त्यांच्या टीमसोबत ते विमानतळावर होणाऱ्या बेकायदेशीर हालचालींचा शोध घेतात. कथानकात मोठा ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा त्यांचा सामना आंतरराष्ट्रीय पातळीवरील तस्करी करणाऱ्या शक्तिशाली सिंडिकेटशी होतो.
या सिंडिकेटचा प्रमुखTaskaree  ‘बडा चौधरी’ ही भूमिका शरद केळकर  यांनी साकारली असून त्यांच्या दुहेरी भूमिकेमुळे कथानकाला अधिक गूढता प्राप्त होते. याशिवाय फ्लाईट अटेंडंट ‘प्रिया’ची भूमिका झोया अफ्रोज यांनी साकारली असून कथानकात तिची एन्ट्री महत्त्वपूर्ण वळण ठरते.कथेच्या पुढील टप्प्यात प्रिया एका तस्करी प्रकरणात अडकते आणि नंतर ती स्वतःच या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी अंडरकव्हर सहकारी म्हणून काम करू लागते. प्रत्येक भागात नवे रहस्य, धोकादायक परिस्थिती आणि तपास यंत्रणांचे गुंतागुंतीचे डावपेच यांमुळे मालिकेची उत्कंठा कायम राहते.
सस्पेन्स, क्राईम आणि थ्रिलचा उत्तम संगम असलेली ही मालिका वीकेंड बिंज-वॉचिंगसाठी एक प्रभावी पर्याय ठरत आहे, असे प्रेक्षकांचे मत आहे.