तपोवन जंगल हत्याकांडाचे रहस्य उलगडले

-युवतीची झाली होती हत्या -मावस भावाला झाली अटक

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
अमरावती, 
tapovan-forest-massacre : येथील गाडगे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तपोवनच्या जंगल परिसरात युवतीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक असलेल्या या हत्याकांडाचा छडा लावण्यात अमरावती शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. मृत युवतीच्या सख्ख्या मावस भावालाच याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी बहिणीचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याची कबुली आरोपीने दिली आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
 
 
 
amt
 
 
 
चेतन सुनील थोरात (वय २३ वर्षे, रा. तेजस विहार, राजुरा, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २ जून रोजी तपोवन परिसरात एका महिलेचा मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. मृतदेहाची ओळख पटवणे आणि गुन्ह्याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. त्याअनुषंगाने गाडगे नगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
 
घटनास्थळ हे अत्यंत दुर्गम, झाडीझुडपांचे असल्याने तिथे किंवा आसपास कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते. या प्रकरणाचा समांतर तपास करण्यासाठी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात चार विशेष पथके तयार करण्यात आली. पथकांनी अमरावती शहर व ग्रामीण भागातील हरवलेल्या महिलांची माहिती गोळा केली. गोपनीय माहितीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अखेर त्या मृत महिलेची ओळख काजल जितेंद्र इंगळे (वय २२ वर्षे, रा. विश्रोळी, ता. चांदुर बाजार, ह.मु. तेजस विहार, राजुरा, अमरावती) अशी पटली.
 
 
//सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
 
 
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पथकाने परिसरातील तब्बल ३०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मृत काजलचा मावस भाऊ चेतन थोरात याला संशयावरून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने बहिणीची हत्या केल्याची कबुली दिली. ओळख पटू नये म्हणून त्याने मृतदेहावर पेट्रोल टाकून तो जाळल्याचे आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मोबाईल व इतर वस्तू दूर फेकून दिल्याचा गुन्हा कबूल केला आहे. सध्या पोलिस या वस्तू हस्तगत करण्याचे काम करत आहेत.
 
 
ही यशस्वी कामगिरी पोलिस आयुक्त राकेश ओला, पोलिस उपायुक्त श्याम घुगे, रमेश धुमाळ, सपोआ शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे प्रभारी पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे, युनिट २ चे प्रभारी पोलिस निरीक्षक अतुल वर आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी केली आहे.