अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला युद्धाचा तडाख!

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
War hits the US economy मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर स्पष्टपणे उमटू लागले आहेत. इराणशी सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली असून, त्याचा थेट परिणाम अमेरिकेतील महागाईवर झाल्याचे दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे पेट्रोल आणि इतर इंधनांच्या किमती वाढल्या आहेत, परिणामी सर्वसामान्य अमेरिकन नागरिकांच्या खर्चात मोठी भर पडली आहे. मे महिन्यातील महागाईची आकडेवारी समोर आल्यानंतर अमेरिकन प्रशासनाची चिंता वाढली आहे. किरकोळ महागाईचा दर ४ टक्क्यांहून अधिक नोंदवला गेला असून, गेल्या काही वर्षांतील ही सर्वाधिक पातळी मानली जात आहे. सलग अनेक महिन्यांपासून महागाई वाढत असल्याने घरगुती बजेट कोलमडू लागले आहे.  
 
 
ट्रम्प
 
महागाईचा परिणाम केवळ ग्राहकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. अमेरिकन शेअर बाजारालाही त्याचा मोठा धक्का बसला आहे. महागाईचे आकडे जाहीर होताच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता वाढली आणि प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. वाढत्या इंधन दरांमुळे उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने उद्योग क्षेत्रावरही दबाव वाढत आहे.दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर झपाट्याने वाढत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऊर्जा क्षेत्रातील ही अस्थिरता कायम राहिल्यास अमेरिकेतील महागाई आणखी वाढू शकते, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. या आर्थिक दबावाचा राजकीय परिणामही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महागाई नियंत्रणात आणण्याचे आश्वासन देणाऱ्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी वाढती महागाई आणि आर्थिक अस्थिरता मोठे आव्हान ठरत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या किंमती आणि जनतेतील नाराजी याचा फटका सत्ताधारी रिपब्लिकन पक्षालाही बसू शकतो, अशी चर्चा अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.