वर्धेत नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
वर्धा,
wardha-neet-paper : देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज गुरुवारी सायंकाळी शहरात भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात युवक काँग्रेसचे पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली.
 
 
wardha-neet-paper
 
 
 
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा नागपूर विभागीय प्रभारी कपिल ढोके यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. ठाकरे मार्केट परिसरातून सुरू झालेला हा मशाल मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आला. हातात मशाली आणि निषेधाचे फलक घेऊन निघालेल्या आंदोलकांनी “विद्यार्थ्यांना न्याय द्या”, “नीट घोटाळ्याची चौकशी करा”, “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
 
 
मोर्चादरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणाला देशातील शिक्षण व्यवस्थेवरील मोठा डाग असल्याचे म्हटले. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून नीट परीक्षेची तयारी करतात, मात्र पेपरफुटीमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
 
 
 
युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल ढोके म्हणाले, “नीट पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत युवक काँग्रेसचा लढा सुरूच राहील.”
 
 
मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा राखण्याची मागणी केली. “आम्ही रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा देतो, पण पेपरफुटीमुळे आमच्या कष्टांची किंमत कमी होते. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणे थांबवावे,” अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली.
 
 
या मशाल मोर्चात युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी सागर चव्हाण, सहप्रभारी आयुषी देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, माजी जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, शेखर शेंडे, महिला जिल्हाध्यक्ष अरुणा धोटे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव अफझल बेरा, प्रदेश सचिव अंकुश मुंजेवार, एनएसयूआय अध्यक्ष विश्वभूषण पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
तसेच राहुल सुरकार, अंकित हिवरे, अमित ददगल, प्रतीक सूर्यवंशी, अमोल उघडे, प्रीतम हिंवज, शिवराज शिंदे, अंशुल भोसले, हिमांशू ठाकरे, आयुष ढोमणे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.