हिंगणघाट,
Wardha Vana River अधिक महिन्यातील कमला एकादशी निमित्त शहराची जीवनदायिनी असलेल्या वणा नदी तीरावर आज गुरुवार ११ रोजी सकाळी महाआरती करण्यात आली. वणा मातेच्या प्रती आपली कृतज्ञता व्यत करीत नदी संवर्धनाचा संदेश दिला.
सकाळी ७.३० वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात असंख्य महिला भाविकांनी सामूहिक आरती केली. वणा नदीच्या काठावर दिव्यांचा लख्ख प्रकाश आणि मंगलमय मंत्रोच्चारांनी परिसर दुमदुमून गेला होता. महिलांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे वणा नदी संवर्धनाचा संकल्प केला. यशस्वीतेसाठी रूपेश लाजुरकर, मंगेश वणीकर, तुषार हवाईकर, अशोक मोरे, पुंडलिक भेंडे, मोहन महाराज गंडाईत, पुरुषोत्तम डफ, शंकर मोरे, सचिन मोरे, कुणाल रघाटाटे, वैभव हरणे, बंदिश हरणे, कुणाल महाराज हरणे, ज्ञानेश गंडाईत, संत गाडगेबाबा यात्रा कमिटी आणि वणा नदी संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले .
नदी केवळ पाणी पुरवणारा स्त्रोत नसून ती आपली माता आहे. ही भावना व्यत करण्यासाठी या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. चला, वणा मातेची कृतज्ञता व्यत करू या, या हाकेला हिंगणघाटवासीयांनी प्रतिसाद दिला. कार्यक्रम दरम्यान नदी संवर्धनाबाबत जनजागृती केली.
गर्दीत चोरीचा प्रयत्न
आज वणा नदीत स्नान करीत पूजा करण्यासाठी आलेल्या नेताजी वार्ड येथील जया उजवणे (५९) या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करण्याच्या प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच त्या संशयित महिलेला पकडले. या चोरट्या महिलेची झाडाझडती घेतली. आरोपी महिलेची ओळख सविता खंडारे अशी असून ती वर्धा येथील अशोकनगर परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.