वस्तीत रानडुकराचा धुमाकूळ; दोन जखमी

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
देवळी,
Wild boar attack Deoli जंगल परिसरातील नैसर्गिक पानवठे कोरडे पडल्याने सध्या वन्यप्राणी शेत शिवाराकडे आपला मोर्चा वळवत आहे. असाच रानडुकर पाण्याच्या शोधात लोकवस्तीत शिरला. त्याने राजेंद्र काळे (६८) व लता महल्ले (५६) या दोघांवर हल्ला करून जखमी केले. ही घटना आज गुरुवार ११ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास भिडी येथे घडली.
 

Wild boar attack Deoli 
माकडांचा कळप भिडी गावात जणू मुकामीच आहे. शेत शिवारापर्यंत रोही, नीलगाय येत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीतही भर पडली आहे. दरम्यान, आज सकाळी रानडुकर गावात शिरले. सैरवैर पळणार्‍या रानडुकराने घराच्या अंगणात उभ्या असलेल्या राजेंद्र काळे यांच्यावर हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यानंतर दुसर्‍या बोळीकडे धूम ठोकली. या ठिकाणी त्याने लता महल्ले यांना जखमी केले. या हल्ल्यात दोघे जखमी झाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना तातडीने भिडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वनविभागाच्या अधिकार्‍यांना घटनेची माहिती दिली. वनविभागाने या परिसरातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.