अनिल कांबळे
नागपूर,
Yashodhara Nagar murder गुन्ह्यातील आरोपीला अटक करताना कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करावी आणि आरोपीला कळेल त्या भाषेत अटकेचे कारण समजून सांगावे. ही कायदेशिर प्रक्रिया पार न पाडल्यास पोलिसांनी केलेली अटक ही अवैध ठरते, असे महत्वपूर्ण निरीक्षण जिल्हा न्यायालयाने नोंदवले. शहरातील चर्चित यशोधरानगर हत्याकांडात बुधवारी मोठे कायदेशीर वळण आले. अटकेची प्रक्रिया कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पार पडली नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीची अटक बेकायदेशीर ठरवली आणि त्याच्या तात्काळ मुक्ततेचे आदेश दिले. या निर्णयामुळे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
यशोधरानगर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) व ३(५) अंतर्गत मुजम्मिल उर्फ मुज्जू हसन अली याला अटक केली होती. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करून चार दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. प्रकरण गंभीर असून तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने आरोपीची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते.
सुनावणीदरम्यान तपास अधिकारी एपीआय पाटील यांनी न्यायालयासमोर पोलिसांची बाजू मांडताना हत्येशी संबंधित अनेक बाबींचा तपास अद्याप बाकी असल्याचे सांगितले. त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडीत ठेवणे आवश्यक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
मात्र बचाव पक्षाचे Yashodhara Nagar murder वकील अॅड सतुजा, अॅड. डोडानी, अॅड. सचदेव आणि अॅड गोस्वामी यांनी अटकेच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आरोपी केवळ नववीपर्यंत शिक्षण घेतलेला असून त्याला फक्त हिंदी भाषा समजते. असे असताना अटकेची कारणे (ग्राउंड्स ऑफ अरेस्ट) त्याला मराठी भाषेत देण्यात आल्याचा मुद्दा बचाव पक्षाने मांडला. तसेच अटकेशी संबंधित कागदपत्रांमध्ये अटकेची स्पष्ट कारणे नमूद नसल्याचे आणि ही माहिती आरोपीच्या कुटुंबीयांनाही देण्यात आली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा दाखला देत आरोपीला त्याला समजणाऱ्या भाषेत अटकेची कारणे सांगणे बंधनकारक असल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग एम. डी. बिरहारी यांनी अटकेच्या प्रक्रियेत आवश्यक कायदेशीर तरतुदींचे पालन झाले नसल्याचे नमूद केले. न्यायालयाने पोलिसांची रिमांड याचिका फेटाळून लावत अटक बेकायदेशीर घोषित केली आणि आरोपीला तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या आदेशानंतर यशोधरानगर हत्याकांडाच्या तपासावर आणि पोलिसांच्या पुढील कायदेशीर भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.