जिल्हाधिकारी अचानक तिवसा रुग्णालयात पोहोचले
तिवसा,
District Collector Yerekar अमरावती - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पृष्ठभूमीवर तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी शुक्रवारी सकाळी अचानक रुग्णालयाला भेट देत संपूर्ण व्यवस्थेची झाडाझडती घेतली. रुग्णालयातील ढिसाळ कारभार, अपुरी वैद्यकीय यंत्रणा आणि बंद अवस्थेतील ट्रॉमा केअर युनिट पाहून जिल्हाधिकारी संतप्त झाले. एकतर प्रामाणिकपणे कर्तव्य बजावा, अन्यथा मेळघाटात जाण्यासाठी तयार रहा, अशा कठोर शब्दांत त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना सुनावले.
अमरावती ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग हा राज्यातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक मानला जातो. या मार्गावर वारंवार होणार्या भीषण अपघातांमध्ये अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र अशा परिस्थितीत तिवसा उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने किरकोळ जखमी रुग्णांनाही थेट अमरावती येथे रेफर करण्याची वेळ येत आहे. अमरावती ते तळेगाव दरम्यान एकही मल्टिस्पेशालिटी रुग्णालय नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी सातत्याने लक्ष वेधले होते. त्यांनी मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकार्यांकडे निवेदन सादर करून तिवसा येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, अत्याधुनिक रक्तपेढी आणि ट्रॉमा केअर युनिट सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत जिल्हाधिकार्यांनी प्रत्यक्ष रुग्णालयाची पाहणी केली.
एकच डॉक्टर उपस्थित
जिल्हाधिकारी आशिष येरेकर सकाळी अचानक रुग्णालयात पोहोचले असता कर्तव्यावर केवळ नाईट शिफ्टमधील एकच डॉक्टर उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगत त्यांनी संबंधित अधिकार्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. यावेळी त्यांनी उपस्थिती नोंदवही, औषध साठा, एक्स-रे विभाग, वॉर्डातील रुग्णांची स्थिती, सार्वजनिक शौचालये, डायलिसिस सेंटर तसेच रुग्णालय परिसराची सखोल पाहणी केली. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी तहसीलदार मयुरी कळसे, नायब तहसीलदार आशिष नागरे, नरेंद्र कुरडकर व अमोल देशमुख, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. गौरव विधडे, नगराध्यक्ष प्रतिभा गौरखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता बोरसे, महावितरणचे अधिकारी उईके, नगरसेवक वैभव वानखडे, प्रणव गौरखेडे तसेच तिवसा शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.