मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला होलसेल डीलर्सची पाठ
पुलगाव,
Urea linking process मृग नक्षत्राला सुरुवात झाली असून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. पेरणी योग्य पावसाची तेवढी वाट आहे. शेतकरी बी बियाणे, खतं जमा करतो आहे. बियाण्यांसोबत खतांची गरज असते. परंतु, शेतकर्यांना युरिया सोबत लिंकिंग घ्या तरच तुम्हाला युरिया मिळेल असे कृषी केंद्रातून सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी लिकींग होता कामा नये असे आदेश दिले असताना होलसेल दुकानदारांनी त्याला वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचे चित्र आहे.
यावर्षी खताचे भाव गगनाला भिडले असून शेतकरी चिंतेत आहे. त्यात या युरिया लिंकिंगच्या प्रक्रियेमुळे शेतकर्यांची आणखी डोकेदुखी वाढली आहे. युरिया सोबत लिंकिंग घ्याल तरच तुम्हाला युरिया मिळेल अशी मनमानी सध्या तालुयात सर्व कृषी केंद्रात पाहायला मिळत आहे. गावातील दुकानात युरिया, बियाणे घेण्याकरता शेतकरी गेले असता लिंकिंग घ्याल तरच युरिया मिळेल. आम्हाला सुद्धा होलसेलर डीलर लिंकिंग शिवाय युरिया देत नाही, असे सांगितले जाते. यात शेतकरी भरडला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिंकिंग वगैरे कुठे राहणार नाही, शेतकर्यांना युरिया प्रत्येक दुकानातून मिळेल असे जाहीर केले आहे.