- कोतवाली पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
अनिल कांबळे
नागपूर,
Accidental Death: Mukund Babhare महाल परिसरात रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बडकस चौकातून आयचीत मंदिराकडे जात असताना गजानन मंदिराजवळ भरधाव एका अज्ञात कारने ७२ वर्षीय मुकुंद बाभरे (रा. झेंडा चौक, महाल) यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या बाभरे यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली आणि त्यांचे आज शुक्रवारी पहाटे निधन झाले.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अपघात घडून पाच दिवस उलटूनही आरोपी वाहनचालकाचा शोध लागलेला नाही. कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला तरीही तपासात अद्यापपर्यंत आरोपी चालकाचा शोध न लागल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, वाहनाचा मागोवा आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपीपर्यंत पोहचणे शक्य असताना अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे आरोपीला ताब्यात घेण्याबाबत विनंती केली असून अद्याप पोलिसांना कोणताही सुगावा लागला नाही. अपघाताचे गंभीर स्वरूप आणि त्यानंतर झालेला मृत्यू लक्षात घेता आता या प्रकरणात अधिक कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. “सीसीटीव्ही फुटेज असतानाही पाच दिवस आरोपीचा शोध लागला नाही. पोलिसांच्या तपासाच्या गतीवर आणि कार्यक्षमतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपी वाहनचालकाला अटक करून मृताच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी जोर धरत आहे.