प्रवीण पोटे व रवी राणा यांच्यात मनोमिलन

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
अमरावती विधान परिषद निवडणूक
 
अमरावती, 
Amravati Legislative Council Election विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे व युवा स्वाभीमानचे आमदार रवी राणा यांनी राजकीय वादावर पडदा टाकला आहे. त्यांचे गुरूवारी रात्री मनोमिलन झाले. यावेळी खा. अनिल बोंडे हजर होते. या मनोमिलनाने पोटे यांच्या मार्गातला मोठा अडथळा दूर झाला आहे. ही मैत्री फक्त निवडणुकीपुरतेच राहते की पुढेही कायम राहील, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
 
amt 
 
भाजपा नेत्या नवनीत राणा, युवा स्वाभिमानचे प्रमुख आ. रवि राणा आणि प्रवीण पोटे यांच्यात विळ्याभोपळ्याचे राजकीय वैर आहे. अनेकदा अमरावतीकरांनी ते अनुभवले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत राणा दाम्पत्य पोटे यांच्या बाजुने नव्हतेच! त्याला लोकसभा निवडणुकीतल्या घटनाक्रमाची किनार होती. नवनीत यांनी तर भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली होती. त्यामुळे संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे संकेत मिळाले होते. एखादा अपक्ष उमेदवार उभा करून पोटे यांची कोंडी करण्याची तयारी सुधा झाली होती. अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राणा दाम्पत्याला सबुरीचा सल्ला दिल्यावर त्यांनी तलवार म्यान केली.
 
 
अखेर खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या साक्षीने दोन नेत्यांमध्ये गुरूवारी रात्री मनोमिलन झाले. दोघांनी एकमेकांवर शाल टाकून सत्कार केला. महायुतीचे उमेदवार म्हणून प्रवीण पोटे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा अशावाद व्यक्त करताना युवा स्वाभिमान त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे आ. राणा यांनी सांगितले. असे असले तरी भाजपा नेत्या नवनीत राणा या घटनाक्रमात कुठेही दिसल्या नसल्याने चर्चा कायमच आहे.