नाशिक
ujjwal nikam महाराष्ट्रासह देशभरात चर्चेत असलेल्या नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. या प्रकरणातील अंधश्रद्धा विरोधी कायद्याशी संबंधित खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर राजकीय तसेच कायदेशीर वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने ११ जून २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या निर्णयानुसार, नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण आठ विविध गंभीर गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांचे कामकाज आता ॲड. निकम पाहणार आहेत. या प्रकरणात सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. परिमल फाळे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते ॲड. निकम यांना सहकार्य करतील. दोन्ही वकिलांच्या मानधनाचा खर्च राज्याच्या गृह विभागाकडून करण्यात येणार आहे.
सध्या आरोपी अशोक खरात पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात एकापाठोपाठ आठ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यांमध्ये बलात्कार, फसवणूक, गुंगीकारक औषध देणे, जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन तसेच फार्महाऊसवर पिस्तूल आणि जिवंत काडतुसे आढळल्यामुळे आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे.
या प्रकरणाच्या ujjwal nikam तपासासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून सरकारवाडा पोलीस आणि गुन्हे शाखा संयुक्तपणे तपास करत आहेत. दरम्यान, आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेच्या तपासासाठी अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी)ही एंट्री झाली असून आरोपीच्या आर्थिक स्त्रोतांचा सखोल तपास सुरू आहे.
या संपूर्ण प्रकरणातील गंभीर स्वरूप आणि बहुआयामी गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात असून पुढील कायदेशीर प्रक्रिया अधिक वेगाने आणि काटेकोरपणे पार पडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.