गडचिरोली,
B. Prabhakaran औद्योगिक विकासासोबतच शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन घडविण्याचा ध्यास घेतलेल्या लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी गडचिरोलीच्या युवकांसाठी उभारलेला आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा मार्ग आज यशस्वीपणे फुलताना दिसत आहे. एकेकाळी परदेशातील नामांकित विद्यापीठात शिक्षण घेणे हे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी केवळ स्वप्न होते. मात्र प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीमुळे ते स्वप्न आता वास्तवात उतरले आहे.
गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचा विश्वास बाळगून बी. प्रभाकरन यांनी स्थानिक विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला. या उपक्रमामुळे आज जिल्ह्यातील 24 विद्यार्थी ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी केवळ स्वतःचेच नव्हे तर संपूर्ण गडचिरोलीचे प्रतिनिधित्व करत असून त्यांच्या यशामागे प्रभाकरन यांची विकासदृष्टी अधोरेखित होत आहे.
या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता चौथ्या बॅचसाठी अर्ज प्रक्रिया 13 जूनपासून सुरू होत असून 20 जूनपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे आणखी अनेक विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाचे दरवाजे खुले होणार आहेत. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या सीएसआर विभागाअंतर्गत कार्यरत लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनमार्फत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला जात आहे. शिक्षण शुल्क, राहण्याचा खर्च, प्रवास तसेच शिक्षणाशी संबंधित सर्व खर्च कंपनीकडून करण्यात येत असल्याने आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे स्वप्न अपूर्ण राहत नाही.
विशेष म्हणजे, प्रत्येक विद्यार्थ्यावर दरवर्षी सुमारे 50 लाख रुपये खर्च करण्यात येत असून संपूर्ण शिक्षणासाठी प्रति विद्यार्थी दीड ते दोन कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जात आहे. गडचिरोलीच्या युवकांमध्ये गुंतवणूक करून भविष्यातील नेतृत्व घडविण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. गेल्या दोन वर्षांत या उपक्रमाच्या तीन यशस्वी बॅचेस परदेशात दाखल झाल्या आहेत. त्यांचे यश आज जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. औद्योगिक प्रगतीसोबतच सामाजिक बांधिलकीची जपणूक करत बी. प्रभाकरन यांनी गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा दिली असून शिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्याचे भविष्य घडविण्याचे त्यांचे स्वप्न आता प्रत्यक्षात आकार घेत आहे.